मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ६० कोटींची तरतूद केल्यानंतर आता आणखी तीन कोटी रुपये खड्डय़ात घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई- मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ६० कोटींची तरतूद केल्यानंतर आता आणखी तीन कोटी रुपये खड्डय़ात घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी चक्क भंगारात टाकलेल्या जेट पॅचर मशिनचा वापर केला जाणार आहे. मुंबईतील खड्डे पडलेल्या २३ रस्त्यांची निवड करून या मशिनद्वारे हे खड्डे भरण्यासाठी हा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे एका रस्त्यासाठी सरासरी १३ लाख रुपयांचा चुराडा खड्डय़ांच्या नावाखाली होणार आहे.
मुंबई महापालिकेने पावसाळ्यात पडलेले खड्डे उष्णताविरहित डांबराचे मिश्रण वापरून दुरुस्त करण्यासाठी सन २००८ मध्ये मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन जेट पॅचर मशिन खरेदी केल्या. मात्र खरेदी केल्यापासून या मशिनचा वापर करून खड्डे बुजवण्यात फारसे यश महापालिकेला आले नाही. महापालिकेने लाखो रुपयांची ही यंत्रसामग्री खरेदी करून ‘स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला खड्डे बुजवण्यासाठी कंत्राट दिले होते. मागील वर्षी प्रशासनाने ही मशिन बाहेर काढली नव्हती. ही मशिन यानगृहातील कोप-यात पडून असताना या वर्षी या खड्डे बुजवण्यासाठी ३ कोटी रुपयांचे कंत्राट दिले जात आहे. हे कंत्राट यापूर्वी महापालिकेला खड्डय़ांच्या नावावर ‘चुना’ लावणा-या ‘स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीलाच देण्यात येत आहे. या कंपनीने ३ कोटी रुपयांचे काम केल्यानंतर हे कंत्राट रद्द होईल अशी अट घालत ही रक्कम या कंपनीच्या खिशात जाणीवपूर्वक सारण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून होत आहे.
जुन्याच निविदांवर नव्याने काम
मागील वर्षी या मशिनद्वारे खड्डे बुजवण्यात आले नव्हते. मात्र या मशिनद्वारे खड्डे बुजवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र, या निविदा पावसाळ्यापूर्वी न मागवता त्या चक्क पावसाळ्यानंतर काढण्यात आल्या. त्यामुळे पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेल्यानंतर वरातीमागून घोडे दामटवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यापेक्षा कंत्राटदाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी केला आहे.
जेट पॅचर मशिनचा उपयोग काय?
खड्डय़ात साचलेले पावसाचे पाणी शोषून घेतले जाते. त्यानंतर जेट पॅचर मशिनचा वापर करून डांबराचे मिश्रण टाकून खड्डे बुजवले जातात. यासाठी रस्ता पूर्ण सुकवण्याची वाट पाहावी लागत नाही. थोडा पाऊस असतानाही हे काम करता येते. अद्ययावत तंत्रज्ञान म्हणून हे मशिन खरेदी केले असले तरी त्याचा वापर करून मुंबईतील खड्डे व्यवस्थित बुजवले असल्याचा शेरा देण्यात आलेला नाही.
येथील रस्ते खड्डय़ात
शहर परिसर
सी.पी.टँक रोड, स्लेटर रस्ता, विद्यालंकार कॉलेज रस्ता, भैरवी नाक्याजवळ जाणारा रस्ता, मनमाला टँक रोड.
पूर्व उपनगर
नाहर अमृतशक्ती येथील आतील रस्ते, आगरवाडी रस्ता, देवनार कॉलनी मार्केट रस्ता, टिळक नगर येथील बिल्डिंग क्रमांक ८६ ते ९१ येथील रस्ता, घाटकोपर सिंधी सोसायटी, पार्वतीबाई शेट्टी मार्ग, राजावाडी रोड क्रमांक२, राजावाडी रोड क्रमांक ३, विक्रोळी पश्चिम पी. सोमन मार्ग, घाटकोपर पूर्व येथील पंतनगर इमारत क्रमांक ८३ ते ६१मधील रस्ते, मुलुंड पश्चिम डम्पिंग रोड ते एन.एस.बी. रोड, आर.पी रोड.
पश्चिम उपनगर
अंधेरी पश्चिम, पटेल इस्टेट रोड, पोलिस ठाणे ते रेल्वे स्टेशन मार्ग, पाटलीपुत्र क्रॉस मार्ग, नारायण चव्हाण रोड (इदगा रोड), कॉस्मोपॉलिटीन सोसायटी रोड, डी. एन. नगरमधील आतील रस्ते, कॅप्टन सावंत मार्ग.
जेट पॅचिंग मशिनद्वारे खड्डे बुजवण्यासाठी यंदा २३ रस्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या कामासाठी कंत्राटदाराचीही निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर जेट पॅचिंग मशिनद्वारे हे खड्डे बुजवले जातील. – दत्तात्रय दीक्षित, प्रमुख अभियंता, रस्ते विभाग