विकासकाकडे दीड लाख रुपये लाच मागून एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना मालाडच्या अतिक्रमणविरोधी कार्यालयातील दोन नायब तहसीलदार प्रवीण पाटील आणि अनिल भोईर यांना सोमवारी सकाळी त्यांच्याच कार्यालयात अटक करण्यात आली.
मुंबई- विकासकाकडे दीड लाख रुपये लाच मागून एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना मालाडच्या अतिक्रमणविरोधी कार्यालयातील दोन नायब तहसीलदार प्रवीण पाटील आणि अनिल भोईर यांना सोमवारी सकाळी त्यांच्याच कार्यालयात अटक करण्यात आली.
तक्रारदार व्यवसायाने विकासक असून त्यांनी मालाड येथील ओमदत्त कृपा वेल्फेअर एसआरए गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाचे काम फिर्यादीने हाती घेतले आहे. त्याला काही स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळे या रहिवाशांनी त्यांच्याविरुद्ध वांद्रे तहसीलदार कार्यालयात अपिल केले होते. मात्र हे अपिल फेटाळण्यात आले आहे.
तसेच या रहिवाशांना तातडीने घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी मालाड येथील नायब तहसीलदार प्रविण पाटील आणि अनिल भोईर यांना घरे रिकामी करण्यासंबंधी नोटीस बजावण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात फिर्यादी दोन्ही अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी या दोघांनी घर खाली कारण्याची नोटीस काढण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र ही रक्कम जादा असल्याने त्यांनी ती कमी करण्याची विनंती केली होती. चर्चेअंती दीड लाख रुपयांवर समझोता झाला होता. त्यातील एक लाख रुपये आधी आणि निष्कासन केल्यानंतर उर्वरित ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते.
ही रक्कम देण्याची तयारी दर्शवून या विकासकाने प्रविण पाटील आणि अनिल भोईर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर सोमवारी सकाळी मालाड येथील त्यांच्या कार्यालयात साध्या वेशात सापळा लावला आला. यावेळी विकासकाकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोघांनाही अटक करण्यात आली.