मुलींच्या शिक्षणासाठी नामांकित असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एसएनडीटी) मात्र मुलींना ‘फॉर्मल ड्रेस कोड’ची सक्ती केली आहे.
मुंबई- देशात मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम सुरू असताना राज्यात आणि देशात मुलींच्या शिक्षणासाठी नामांकित असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एसएनडीटी) मात्र मुलींना ‘फॉर्मल ड्रेस कोड’ची सक्ती केली आहे. हे फर्मान तूर्तास विद्यापीठाच्या चर्चगेट संकुलासाठी असले तरी याची अंमलबजावणी विद्यापीठाच्या अंतर्गत येणा-या महाविद्यालयांतही सुरू झाल्याने मुलींत तीव्र नाराजी आहे.
फॉर्मल ड्रेस कोडचा हा निर्णय आमच्या कपडे वापरण्याच्या अधिकाराचे हनन असल्याच्या प्रतिक्रिया काही विद्यार्थिनींनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिल्या. आतापर्यंत अशा प्रकारचे ‘फॉर्मल ड्रेस कोड’चे आदेश आमच्याकडे यापूर्वी कधीही देण्यात आले नव्हते, असे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांनी सांगितले. या निर्णयाचा विद्यार्थ्यांकडून विरोध होत असला तरी घाबरून कोणी तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
एसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईतील चर्चगेट-संकुलात विविध शाखांसाठी सुमारे ५ हजार मुली शिक्षण घेत आहेत. या मुलींना विद्यापीठाने काढलेल्या नव्या फर्मानामुळे रोज ‘फॉर्मल ड्रेस कोड’मध्ये यावे लागत आहे. या ड्रेसकोडसाठी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनीच पुढाकार घेतला आहे. यासाठी विद्यापीठाअंतर्गत येणा-या महाविद्यालयांच्या प्राचार्यासोबत विद्यापीठाच्या सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून त्यासाठीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यापीठाने काढलेल्या या फॉर्मल ड्रेस कोडमध्ये कोणत्याही प्रकारचे शॉर्ट कपडे वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी सांगितले की, आम्ही हा निर्णय मुलींच्या हितासाठी आणि काही पालकांशी चर्चा करून घेतला आहे. यात चांगले कपडे म्हणजे अंगभर कपडे असावेत, असा याचा अर्थ आहे. नेमका कोणता रंग आणि कोणते कपडे असा याचा अर्थ नाही. मुंबईतील वातावरण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामागे आमचा चांगला हेतू असल्याचेही कुलगुरूंनी ‘प्रहार’शी बोलताना सांगितले. या कोडविषयी अंमलबजावणी करण्यात आल्यानंतर मुलींकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्याकडे अद्याप कोणत्याही मुलींनी तक्रार केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.