वाढीव वजनामुळे आरटीओच्या नियमांत न बसणा-या स्कॅनिया बसने एसटीचा नो एंट्रीचा फलक बाजूला सारत थेट एसटी आगारात प्रवेश केला आहे.
मुंबई – वाढीव वजनामुळे आरटीओच्या नियमांत न बसणा-या स्कॅनिया बसने एसटीचा नो एंट्रीचा फलक बाजूला सारत थेट एसटी आगारात प्रवेश केला आहे. वाहतूक नियमांत नवी तरतूद केल्यानंतर या गाडय़ांचा सामावेश एसटीच्या ताफ्यात करण्यात आला आहे. त्यामुळे वाढीव वजनासहित स्कॅनिया (अश्वमेध) कंपनीच्या रायगड आरटीओ पासिंग असलेल्या तीन बस एसटीच्या परळ आगारात दाखल झाल्या आहेत.
प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने युरोपातील स्कॅनिया कंपनीच्या आरामदायी ३५ गाडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सुरुवातीला आरामदायी तीन मल्टिअॅक्सल गाडय़ा दाखल झाल्यानंतर या गाडय़ा आरटीओच्या वजनाच्या कचाटय़ात सापडल्या होत्या. आरटीओच्या नियमांनुसार जास्तीत जास्त बारा टन एवढे वजन हवे असताना या गाडय़ांचे वजन तेरा ते साडेतेरा एवढे भरत होते. त्यामुळे या गाडय़ांची खरेदी रद्द करण्याचा विचार एसटी महामंडळाने केला होता.
मात्र, स्कॅनिया कंपनीने वाढीव वजनाची कारणे स्पष्ट करत जुन्या वाहतूक नियमांमध्ये नवीन तरतुदी आवश्यक असल्याची मागणी केली होती. वाढत्या आरामदायी सेवा पुरवण्यासाठी वापरण्यात येणा-या साहित्याचे वाढते वजन यामुळे गाडीच्या वजनात वाढ होणे स्वाभाविक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. त्यानुसार केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भात दखल घेत वाहतुकीच्या नियमात नवीन तरतूद केल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिका-याने दिली.
नव्याने दाखल झालेल्या बसमध्ये प्रवाशांच्या सीसीटीव्ही बसवण्यात आले असून प्रवाशांच्या सुरक्षेची आणि आरामदायी प्रवासाची विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, नव्या आरामदायी गाडय़ांमुळे खासगी बसकडे वळलेले प्रवासी पुन्हा एसटीने प्रवास करतील, असा विश्वास एसटीतील अधिकारी व्यक्त करत आहेत.
- बसची किंमत प्रत्येकी दीड कोटी
- आपात्कालीन दाराकरता दोन आसने कमी केल्याने ५१ आसने उपलब्ध
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा
- अग्निप्रतिबंधात्मक यंत्रणा (२)
- मोठय़ा खिडक्या, संकटसमयी खिडक्या तोडण्याचीही व्यवस्था
- तीन टीव्ही स्क्रीन
- पहिल्या चार आसनांना (उजव्या आणि डाव्या बाजूने प्रत्येकी दोन) सीट बेल्ट
- प्रवाशांकरता आरामदायी आसने
- मोबाईल चार्ज करण्याकरता चार्जिग सॉकेट