एसटी कर्मचा-यांच्या वेतन कराराबाबत सकारात्मक तडजोड करण्याचे संकेत कामगार संघटनेकडून देण्यात आल्याने या प्रकरणावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.
मुंबई – एसटी कर्मचा-यांच्या वेतन कराराबाबत सकारात्मक तडजोड करण्याचे संकेत कामगार संघटनेकडून देण्यात आल्याने या प्रकरणावर तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. सरकारने देऊ केलेली १० टक्के पगारवाढ व संघटनेने केलेली २२ टक्के पगारवाढीची मागणी याचा सुवर्णमध्ये साधून अंतिम पगारवाढ ठरवली जावी, अशी मागणी पुढे येत आहे. सरकारही या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एसटी कर्मचा-यांचा वेतनकरार अनेक बाबींमुळे रखडला होता. नियमित कर्मचा-यांना १० टक्के पगारवाढ हा यातील कळीचा मुद्दा ठरला होता. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेने या पगारवाढीला विरोध करत २२ टक्के पगारवाढीची मागणी लावून धरली होती. मात्र सरकारची व एसटी महामंडळाची सध्याची स्थिती पहाता एवढी पगारवाढ देणे शक्य नव्हते. त्यामुळे कामगार संघटनेनेही तडजोड करण्याचे संकेत दिले आहेत.