ऑनलाइनचा गोंधळ कायम राहिल्यामुळे राज्यातील सरकारी आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.
मुंबई- राज्यातील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी २४ जुलैपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र या संकेतस्थळात अनेक प्रकारच्या त्रुटी निर्माण झाल्याने असंख्य विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता आले नव्हते. त्यामुळे दोन वेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही ऑनलाइनचा गोंधळ कायम राहिल्यामुळे राज्यातील सरकारी आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.
आयटीआयच्या ऑनलाइन प्रवेशातील गोंधळाचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. त्यामुळे दोन वेळा या प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशासाठी १० ते १३ ऑगस्टदरम्यान विशेष प्रवेश फेरी आयोजित केली होती. मात्र या फेरीलाही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने यंदा सरकारी आयटीआयमधील अनेक अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त राहिल्याची माहिती माहीतगारांकडून देण्यात आली.
राज्यातील आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुलभ, जलद, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट-२०१३ प्रवेशसत्राची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अडचणीची ठरली. ऑनलाइन अर्ज करताना संकेतस्थळातील अनेक त्रुटींमुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले.
‘आयडॉल’च्या प्रवेशाची मुदत वाढणार
मुंबई विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या दूरमुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) ऑनलाइन प्रवेशाची अखेरची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपणार आहे. मात्र ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटींमुळे ‘आयडॉल’ला या प्रवेशातही मागील वर्षाच्या प्रवेशाची आकडेवारी गाठता आली नसल्यामुळे पुन्हा एकदा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आयडॉलच्या अधिका-यांनी दिली.
जून अखेरपासून आयडॉलची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत या प्रवेशाला दोन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ ६० हजार प्रवेशांचा आकडा आयडॉलने गाठला. मागील वर्षापेक्षा ही संख्या तब्बल पंधरा हजारांहून कमी आहे.
आयडॉलच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत अनेकदा त्रुटी निर्माण झाल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांनी या प्रवेशाकडे पाठ फिरवल्याने प्रवेश कमी झाल्याचे अधिका-यांनी सांगितले. आयडॉलमधील पदवी आणि पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश आणि त्यासंदर्भातील माहिती विद्यापीठाच्या www.mu.ac.in/idol व www.mahaonline.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
आतापर्यंत दीड लाखांच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली तरी केवळ ६२ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आयडॉलमध्ये अधिकाधिक प्रवेश व्हावेत, यासाठी आमचे प्रयत्न असून आवश्यकता पडली तर येत्या काही दिवसांत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल. – डॉ. हरिचंदन, संचालक, आयडॉल, मुंबई विद्यापीठ