गणपती आता अवघ्या पाच दिवसांवर आले आहेत. त्यामुळे खरेदी झाली असली तरी लहानशा घरात कुठे काय ठेवायचं, हा प्रश्न कायम पडतो. घर कितीही मोठं असलं की, पाहुण्यांच्या गर्दीत ते लहानच वाटायला लागतं. उपलब्ध असलेल्या सामानात थोडासा बदल करून आहे त्यातच छान सजावट करता येते.
- सणाच्या वेळी घरात पाहुण्यांची रेलचेलच असते. अशा वेळी मोठय़ा घरातही वावरायला थोडी अडचणच होते. मोठे सोफा सेट घराला शोभा तर देतातच आणि आलेल्या पाहुण्यांसाठी सोयीस्करही ठरतात. मात्र त्यांची अडचणच अधिक होते. लहान घर आणि जास्त सामान असेल तर स्टोअरेज सोफाही निवडावा. लाकडाचे किंवा स्टीलचे सोफा कम बेड हा आणखी एक प्रकार बाजारात उपलब्ध आहे. लहान घरात हा खूप फायदेशीर ठरतो. दिवसा सोफा आणि रात्री झोपायला त्याचाच बेड करता येतो. पाहुण्यांच्या बसण्याची आणि झोपण्याची, अशी उत्तम सोय होते.
- घराचा बराचसा भाग हा नेहमी वेगवेगळ्या कपाटांनीच व्यापलेला असतो. त्यामुळे घरात ये-जा करण्यासाठी फारच कमी जागा उरते. आणि सणासुदीच्या वेळी तर सामानाने तीही उरत नाही. अशा वेळी शक्यतो फोल्डेबल टेबल्सचा वापर करावा. टीपॉयपासून ते डायनिंग टेबलपर्यंत सगळ्या गोष्टी फोल्डिंगच्या मिळतात. अनेक कप्पे असलेले टीपॉयही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. गणपतीच्या समोर ठेवायला हे टीपॉय उपयोगी पडतात. सोयीनुसार लागणारे पूजेचे साहित्य आपण त्यावर सहज मांडू शकतो. त्यामुळे तुमचे घर सुटसुटीत तर दिसेलच. पण तुमचा गोंधळही होणार नाही. त्याचसोबत स्टूल आणि साइड टेबलचाही वापर करता येऊ शकतो.
- अनेकदा फर्निचर खूप छान असेल आणि भिंतींचा रंग फिका असेल तर ते फर्निचर उठून दिसत नाही. त्यामुळे घरच्या घरी रंगाचा एक हात मारलात तर कमी खर्चात घराला फ्रेश लूक द्यायला मदत होईल. हल्ली घराला रंग देताना फक्त ऑफ व्हाइट आणि पांढराच रंग दिला जात नाही. तुमच्या आवडीनुसार डार्क-लाइट कुठलाही रंग देऊ शकता. त्यात अगदी लाल, जांभळा, केशरी अशा रंगांचाही समावेश होतो. त्याचबरोबर तुम्ही घरातली कुठलीही एक भिंत एकदम डार्क रंगाने रंगवून इतर भिंती त्याच रंगाच्या लाइट शेडने रंगवू शकता. तसंच घरातल्या एका भिंतीवर पेंट करूनही ती भिंत तुम्ही सजवू शकता.
- भिंतीला रंग देऊन ती रिकामीच ठेवण्याऐवजी तुम्ही त्यावर वेगवेगळी पेंटिग्ज हँग करू शकता. कमी दरापासून ते अगदी महागडी वॉल पेंटिंग्ज बाजारात सहज आहेत. तुमच्या आवडीनुसार त्यात अनेक पर्याय पाहायला मिळतील. मुख्य म्हणजे या पेंटिंग फ्रेम्सची लायब्ररी उपलब्ध असते. काही दिवसांसाठी ही पेंटिंग्ज भाडय़ाने घेऊन जाऊ शकता. काम झालं की?परत करता येतात.
- फ्लॉवरपॉट किंवा फुलदाणी ही घर सजावटीतली महत्त्वाची गोष्ट. ही फुलदाणी एका कॉर्नरला ठेवून त्यात खरी किंवा खोटी फुलं ठेवून कोपऱ्याची शोभा वाढवू शकतो. त्यातही स्वस्त दरापासून महागडे फ्लॉवरपॉट्स अनेक ठिकाणी पाहायला मिळतील. काचेचे किंवा चायना प्रकारात मोडणाऱ्या, वेगवेगळ्या आकारातल्या आणि आकर्षक रंगांमधल्या फुलदाण्या होलसेल मार्केटमध्ये थोडय़ा स्वस्त दरात मिळतील.
- पडद्याचे एक-दोन सेट करून ठेवावेत. सण-उत्सवाच्या वेळी दुसरे धुतलेले पडदे लावावेत. हल्ली पारदर्शक पडदे लावायला ट्रेंड रुजू झाला आहे. लोड, कुशन आणि चादरीचेही एक-दोन सेट करून ठेवावेत. ते जास्त वापरू नयेत. सणाच्या वेळी काढावेत.
- जागा लहान असेल तर शक्यतो वस्तू एकात एक घालून ठेवाव्यात. बाहेर वाळत असलेले कपडे घडी करून कपाटात ठेवावेत.
- पुस्तकं कपाटात ठेवावीत. कपाट नसेल तर टेबलावर किंवा शोकेसमध्ये लायब्ररीप्रमाणे
- मांडून ठेवावीत.
- कपाटाच्या फळ्यांवर सामान दिसणार नाही याची काळजी घ्यावी. त्यावर एखादी जुनी साडी किंवा चादर टाकून झाकून ठेवावं.
- आजकाल बाजारात पाण्यावरचे दिवे आले आहेत. त्यासोबत प्लॅस्टिकची?फुलंही मिळतात. एखाद्या कोपऱ्यात किंवा टीपॉयवर हे दिवे लावले की, घराची?शोभा अधिक खुलते.