कांदिवली (पू.) परिसरातील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुंबई – कांदिवली (पू.) परिसरातील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही आई-वडिलांसोबत झोपली असताना, तिला रात्री उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्या लहानगीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी समतानगर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. कांदिवली स्थानकाच्या फाटकानजीक असलेल्या झोपडपट्टीत पीडित मुलगी आई-वडील, बहीण आणि भावासोबत राहते. रात्री आपल्या मुलीला कोणीतरी झोपेतून उचलून नेल्याचे तिच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.
मध्यरात्री पीडित मुलगी रडू लागल्यावर हा प्रकार उघडकीस आला. तिला उपचाराकरता कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. सध्या तिच्यावर बालरोग चिकित्सा विभागात उपचार सुरू आहेत.
तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, तिची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय सांडभोर यांनी सांगितले.