शिक्षक आणि शाळांना उद्ध्वस्त करणा-या शिक्षण विभागाच्या काळया जीआरची होळी ‘शिक्षक भारती’ संघटनेने ‘शिक्षक दिनी’मुंबईत होळी केली.
मुंबई- शिक्षक आणि शाळांना उद्ध्वस्त करणा-या शिक्षण विभागाच्या काळया जीआरची होळी ‘शिक्षक भारती’ संघटनेने ‘शिक्षक दिनी’मुंबईत होळी केली. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली परळच्या कामगार मैदानात २८ ऑगस्टच्या जीआरविरोधात ‘काळा दिन’ पाळण्यात आला.
यावेळी जमलेल्या शिक्षकांनी काळया जीआरविरोधात गणेशोत्सावानंतर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शिक्षण हक्क कृती समितीने हा निर्णय घेतला. पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील शिक्षण संस्थाचालक, काँग्रेस शिक्षक सेल आणि मुख्याध्यापक संघटनांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यात ५७ वा राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड व पालघर जिल्ह्यांत शाळा शाळांत शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. तर काही ठिकाणी शिक्षकांनी काळया फिती लावून सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला. देशात साज-या होत असलेल्या ५७ व्या शिक्षक दिनाचे महत्त्व कमी होऊ नये, यासाठी शिक्षकांचा सन्मान व्हावा हा हेतू समोर ठेवून या दिवशी शिक्षक परिषदेने सरकाविरोधी आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र २८ ऑगस्टच्या शासन निर्णयाबाबत सोमवारी पुणे येथे शिक्षक परिषदेची एक महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यानंतर राज्यभरात सरकारविरोधात आंदोलन करण्याची दिशा स्पष्ट केली जाईल अथवा चर्चा करून मार्ग काढला जाण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती शिक्षक परिषदेचे मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी दिली.