देखभालीच्या कामासाठी डबे यार्डात आहेत, प्रवाशांची मागणी झाल्यास गाडी चालवू, अशी वेगवेगळी आश्वासने दिल्यानंतर आता अखेर गणेशोत्सवात डबल डेकर धावणार नसल्याचे निश्चित म्हटले जात आहे.
मुंबई- देखभालीच्या कामासाठी डबे यार्डात आहेत, प्रवाशांची मागणी झाल्यास गाडी चालवू, अशी वेगवेगळी आश्वासने दिल्यानंतर आता अखेर गणेशोत्सवात डबल डेकर धावणार नसल्याचे निश्चित म्हटले जात आहे.
दक्षिण-मध्य रेल्वेवरील डबल डेकरची मागणी मध्य रेल्वेने केली होती. मात्र रेल्वे बोर्डाकडून यावर अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याने या वर्षी कोकणात डबल डेकर धावणे कठीण असल्याचे रेल्वेच्या एका उच्चपदस्थ अधिका-याने सांगितले.
मागील वर्षी कोकणात धावलेली डबल डेकर गाडी यार्डातून बाहेर निघत नसल्याने त्यानंतर मध्य रेल्वेने दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावरील डबल डेकरची मागणी केली होती. दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या अल्प प्रतिसादाअभावी ही गाडी अन्यत्र हलवण्याचा विचार रेल्वे बोर्डाकडून करण्यात आला.
याबाबत रेल्वे बोर्डाकडून अन्य विभागांना विचारणा करण्यात आली. यावर मध्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद देत या गाडीची मागणी केली होती. मात्र गणेशोत्सव काळात कोकणात जाणा-या गाडय़ांचे वेळापत्रक निश्चित झाले असल्याने यानंतर डबल डेकर कोकणात गणेशोत्सवात चालवण्याची शक्यता धूसर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
[poll id=”1102″]
प्रिमियम दराने चालवलेल्या डबल डेकरमुळे मागील वर्षी गणेशोत्सव काळात कोकणात जाणा-या प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली होती. त्यानंतर दिवाळीत ही गाडी पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर धावली. मात्र या काळात कोकणात जाणा-या प्रवाशांची संख्या अल्प असल्याने तिला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर देखभालीचे कारण देत या गाडीचा मुक्काम थेट यार्डात करण्यात आला.
रेल्वेमंत्री कोकणातील असल्याने प्रवाशांच्या मार्गातील डबल डेकरचे विघ्न दूर करतील अशी आशा होती. मात्र आता ही गाडी रुळावर येण्याची शक्यता धूसर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या संबंधित अधिका-यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नाही.
एखाद्या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्यात आल्यानंतर गाडीच्या प्रतिसादाबाबत निष्कर्ष काढण्यासाठी वेळ द्यायला हवा. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने घाईगडबडीत या गाडीवर अल्प प्रतिसादाचा शिक्का मारला. ही गाडी नियमित केली असती तर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असता. गणेशोत्सवात ही गाडी चालणार नसल्याने मध्य रेल्वेने प्रवाशांना केवळ स्वप्न दाखवले असेच म्हणावे लागले.
– संतोष पवार, अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ