परदेशी नागरिकाकडून एक लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रेल्वे गुन्हे शाखेच्या दादर येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराम वडमारेसह सुशील खरात या पोलिस अंमलदाराविरोधात गुन्हा दाखल केला.
मुंबई – परदेशी नागरिकाकडून एक लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रेल्वे गुन्हे शाखेच्या दादर येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराम वडमारेसह सुशील खरात या पोलिस अंमलदाराविरोधात गुन्हा दाखल केला.
बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या परदेशी नागरिकांच्या सुटकेसाठी आणि त्यांचा पासपोर्ट व मोबाइल परत करण्यासाठी या आरोपी पोलिसांनी ५० हजार रुपये घेतल्याचे एसीबीच्या तपासात पुढे आले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
तक्रारदार हे कॅमेरून देशाचे नागरिक असून त्यांचा गारमेंटचा व्यवसाय आहे. १४ मार्चला तक्रारदार कुर्ला रेल्वे टर्मिनस येथून हैदराबादला जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी रेल्वे गुन्हे शाखेचे अंमलदार खरात याने त्यांना दादर रेल्वे गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले. त्यानंतर १७ मार्चपर्यंत त्यांना ताब्यात ठेवले. त्यानंतर वडमारे व खरात यांनी या व्यावसायिकाकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. ब-याच तडजोडीनंतर दोन्ही पोलिसांनी एक लाख रुपये घेण्यास संमती दर्शवली.
या व्यावसायिकाने त्यांना ५० हजार रुपये दिले. त्यानंतर या दोघांनी व्यावसायिकाचे पासपोर्ट व तीन मोबाइल स्वत:कडेच ठेवले. या वस्तू परत करण्यासाठी पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला. त्यानंतर व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार केली. याप्रकरणी एसीबीच्या कारवाईत वडमारे व खरात यांनी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये, पासपोर्ट व तीन मोबाइल स्वीकारल्याचे पुढे आल्यानंतर गुन्हा दाखल केला.
दरम्यान, २४ तारखेला रचलेल्या छाप्यात तक्रारदार पाच हजार रुपये घेऊन भेटले असता वडमारे यांनी पैसे घेण्यास नकार दिला. त्यांचे पासपोर्ट, मोबाइल परत केले. एसीबी अधिक पुरावे गोळा करत आहे. अंतर्गत मतभेदातून आपल्या विरोधात कट रचण्याचा प्रयत्न आहे, या प्रकरणी मी एसीबीला तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वडमारे यांनी सांगितले.