शाडूची माती व या मूर्ती तयार करण्यासाठीचा खर्च वाढल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांकडून शाडू मातीच्या मूर्तीना कमी प्रमाणात पसंती दिली जात आहे.
मुंबई- शाडूची माती व या मूर्ती तयार करण्यासाठीचा खर्च वाढल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात भक्तांकडून शाडू मातीच्या मूर्तीना कमी प्रमाणात पसंती दिली जात आहे. मूर्तिकारांनाही शाडू मातीच्या मूर्ती तयार करणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्यामुळे त्यांनीही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्ती महागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
कमी वेळेत तयार होणा-या, रंगरंगोटी करण्यास सुलभ असल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची कामे मोठय़ा प्रमाणात केली जातात. शाडूची एक मूर्ती तयार करण्यासाठी ५ दिवस लागतात, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती काही तासांत तयार होते. पीपीच्या तुलनेत शाडूच्या मूर्तीचे वजन जास्त असते. त्यामुळे गणेशोत्सव मंडळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना पसंती देतात. मात्र, जुन्या मंडळांकडून आजही शाडूच्या मूर्तीनाच पसंती दिली जात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. घरगुती गणेशोत्सवासाठीही शाडू् मातीच्या मूर्तीची पसंती वाढत असल्याचेही मूर्तिकारांनी सांगितले.
मूर्तिकामाच्या खर्चात वाढ
मूर्तीसाठी लागणा-या काथ्याचे गेल्या वर्षी ९०० रुपयांना मिळणारे बंडल यंदा १ हजार ७०० रुपयांना विकले जात आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची एक गोणी ५० ते ६० रुपयांनी महागली आहे. रंगांच्या किमतींतही ५० ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. मूर्ती कार्यशाळेत काम करणारे कामगारही कमी झाल्याने त्यांना मिळणारा मोबदलाही १०० ते २०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे यंदा मूर्तीच्या किमती २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता मूर्तिकार व्यक्त करत आहेत. मूर्तीच्या किमती वाढल्यामुळे गणेशमंडळेही शाडूच्या मूर्तीच्या तुलनेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना पसंती देत आहेत.
पूर्वीच्या काळी गणेशमंडळांकडून शाडूच्या मूर्तीची मागणी आवर्जून केली जात होती. यंदा मूर्तिकामाच्या किमतीत वाढ झाली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे मूर्तिकामाचा मोबदला कमी झाला आहे. मोजक्याच मूर्ती बनवल्या जात आहेत. त्यातही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी वेळेत तयार केल्या जात असल्याने त्यांचीच मागणी वाढली आहे. शाडूच्या मूर्तीसाठी लागणारा वेळ, होणारा खर्च जास्त असल्याने या मूर्तीची मागणी कमी झाली आहे. -अतुल पांचाळ, मूर्तिकार