गणरायांचे सोमवारी विसर्जन होणार आहे. मात्र विसर्जन मार्गावर मोजून अवघे १८ खड्डे आहेत. इतर सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
मुंबई – गणरायांचे सोमवारी विसर्जन होणार आहे. मात्र विसर्जन मार्गावर मोजून अवघे १८ खड्डे आहेत. इतर सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र हाताची बोटे मोडून खड्डयांची संख्या मोजली गेली असली, तरी हा दावा फोल ठरला असून, अनेक मार्गावरील या खड्डयांमुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये खड्डे चुकवण्यासाठी भक्तांना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे खड्डयांवर गोणी टाकून मिरवणुका काढाव्यात, असे आवाहन करत खड्डेमुक्त रस्ते झाल्याचा पालिकेचा दावा खोटा असल्याचा आरोपही बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीने केला आहे.
अनंत चतुर्दशीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने शहरात ७२ विसर्जनस्थळांबरोबरच २७ कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली आहे. बाप्पांच्या विसर्जनासाठी महापालिकेची जय्यत तयारी सुरू असली, तरी रस्त्यांवर मात्र खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. मुंबईतील विविध रस्त्यांवर २४२ खड्डे असून, त्यांपैकी ४२४ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिका अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी केला आहे. गणेश विसर्जन मार्गावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी विभाग कार्यालयात रस्ते अभियंता नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मंडळांनी काळजी घ्यावी
रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात न आल्याने यंदा मिरवणुकांमध्ये प्रत्येक मंडळांनी गणेशमूर्तीची काळजी घेण्याचे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष दहिबावकर यांनी केले आहे. ज्या ठिकाणी खड्डे असतील तेथे गोणींचा किवा स्टील प्लेटचा वापर करावा. या कसरतीमुळे मिरवणुकांना विलंब झाल्यास महापालिकाच जबाबदार असेल. मंडळांना दोष देण्यात येऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या आम्ही प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत आहोत. त्या वेळी रस्त्यांवरील खड्डे दिसून येत आहेत. त्यामुळे विलेपार्ले पूर्व येथील श्रद्धानंद रस्ता, चेंबूर अमर महल, वसंतराव नाईक मार्ग, शीव-माटुंगा पोलिस ठाण्यासमोर आदी ठिकाणी खड्डे आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसत नसतील, आम्ही ते दाखवतो. त्यांनी कार्यालयात बसून खड्डयांची संख्या सांगू नये.- अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समिती