एकच क्रमांक असलेल्या दोन वेगवेगळ्या गाडया नवी मुंबईत काही महिन्यांपासून फिरत होत्या. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रवींद्र इथापे यांनी वाहतूक विभागाने दिलेल्या वाहन क्रमांकात बेकायदा फेरफार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई – एकच क्रमांक असलेल्या दोन वेगवेगळ्या गाडया नवी मुंबईत काही महिन्यांपासून फिरत होत्या. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रवींद्र इथापे यांनी वाहतूक विभागाने दिलेल्या वाहन क्रमांकात बेकायदा फेरफार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर इथापे यांच्यावर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.
नवी मुंबईत एकाच क्रमांकाच्या दोन गाडय़ा फिरत असल्याची माहिती व तक्रार वाहतूक विभागाकडे आली होती. एमएच-४३, एएल-७७७७ असा एकच क्रमांक या गाडय़ांचा होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेरुळ येथे राहणारे विनोद तोमर यांनी जुलै २०१२ मध्ये घेतलेल्या ‘चेव्हरलेट क्रूझ’ या गाडीला वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एमएच-४३, एएल-७७७७ हा नंबर दिला होता.
तोच नंबर नेरुळ येथे सेक्टर १९ मध्ये राहणारे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रवींद्र इथापे हे वापरत असलेल्या ‘फॉर्च्युनर’ गाडीवर होता. त्यांना आरटीओने दिलेल्या अधिकृत क्रमांकात त्यांनी बदल केल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.
वाहतूक अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले की, या प्रकरणात इथापे यांच्या गाडीला ७७७१ असा क्रमांक दिला असतांना त्यांनी ७७७७ हा क्रमांक लावल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा असा प्रकार घडल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.