गेल्या काही वर्षापासून गिरणी कामगारांच्या घरांसाठी बाँबे डाईंगची जमीन ताब्यात देण्यास टाळाटाळ करणा-या मालकाने अखेर म्हाडाच्या वाटणीची ३३ हजार ८२२ चौरस मीटर जागा म्हाडा प्राधिकरणाला हस्तांतरीत केली आहे.
मुंबई – गेल्या काही वर्षापासून गिरणी कामगारांच्या घरांसाठी बाँबे डाईंगची जमीन ताब्यात देण्यास टाळाटाळ करणा-या मालकाने अखेर म्हाडाच्या वाटणीची ३३ हजार ८२२ चौरस मीटर जागा म्हाडा प्राधिकरणाला हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे या मिलच्या जागेवर कामगारांना सुमारे पाच हजार घरे बांधण्याचा म्हाडाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत नियम ५८ नुसार बंद गिरण्यांच्या एकूण जमिनीपैकी एक तृतीयांश जमीन म्हाडा व एक तृतीयांश जमीन महापालिकेला देणे बंधनकारक आहे. बाँबे डाईंगच्या प्रभादेवी व वडाळा येथील युनिटमधील वाद गेल्या काही वर्षापासून न्यायालयात होता. हा वाद पुढे सुप्रिम कोर्टापर्यंत गेला. दोन्ही ठिकाणची जमीन देण्याचा आग्रह म्हाडाचा होता.
कंपनीने दोन्हीकडील जमीन देण्याऐवजी वडाळा येथील युनिटमधील एकाच ठिकाणची जमीन देण्याचा दिला होता. हा प्रस्ताव म्हाडानेही मान्य केला. त्यानंतर न्यायालयानेही याबाबतचे निर्देश दिले. त्यामुळे केवळ औपचारिकताच बाकी होती. मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते, पण हस्तांतरणाबाबतची आवश्यक पूर्तता पालिकेकडून झाली नसल्याने जमिनीच्या ताबा प्रक्रियेला विलंब झाला. याकडे मॉनेटरिंग समितीचेही दुर्लक्ष झाले होते.
काही दिवसांपूर्वी या समितीच्या बैठकीत गिरणी कामगार संघर्ष समितीच्या नेत्यांनी या जमिनीचा ताबा का रखडवला जातो आहे, याबाबत बैठकीत मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर ही जमीन म्हाडाला हस्तांतरीत करण्यात आली. या जमिनीवर ३ हजार ६४८ घरे कामगारांना व १ हजार ४४० संक्रमण शिबिरांसाठी मिळून सुमारे ५ हजार घरे बांधली जाणार आहेत. सध्या सेन्चुरीसह पाच मिलच्या जमिनींवर बांधकाम सुरू आहे. या जमिनींवर कामगारांना सुमारे २६०० घरे व बाँबे डाईंगच्या जमिनीवरील पाच हजार घरांचा मार्ग मोकळा झाला आहे. ही घरे सोडतीद्धारे वितरीत केली जाणार आहेत.