साहित्यातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार लाभलेले डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार राज्य सरकारच्या वतीने येत्या गुरुवारी संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई- साहित्यातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार लाभलेले डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार राज्य सरकारच्या वतीने येत्या गुरुवारी संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा, गौरव मराठी भाषेचा’ या अभिनव कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक व मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.
मंत्रालयात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत तावडे यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी राज्यातून साहित्य परिषदेचे सदस्य, साहित्यिक तसेच साहित्यप्रेमींना निमंत्रित करण्यात आले आहे. साधारण सात ते आठ हजार साहित्यप्रेमी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी विनामूल्य प्रवेशिका ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर, पाल्रे दीनानाथ नाटय़गृह, बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह आणि दादरमधील महाराष्ट्र वॉच अँड ग्रामोफोन कंपनी, ठाण्यातील गडकरी रंगायतन, कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृह आणि नवी मुंबईत वाशीच्या विष्णुदास भावे नाटय़गृहात या प्रवेशिका देण्यात येणार आहेत.
वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर या ज्ञानपीठ प्राप्तकर्त्यांचे स्मरण आणि डॉ. भालचंद्र नेमाडे यांचा गौरव असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. साधारण दोन तास चालणा-या या कार्यक्रमात वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाती’ नाटकातील प्रवेश तसेच नटसम्राट नाटकातील प्रवेश सादर होणार आहेत. नेहमीप्रमाणे होणारी राजकीय भाषणे टाळून हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. उत्तरा मोने या कार्यक्रमाच्या समन्वयक आहेत. अनंत खासबारदार व शिरीष खांडेकर यांनी निर्मिती सहकार्य केले आहे.
फैय्याज यांचा अभिनय, श्रीधर फडके, आशा खाडिलकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, नंदेश उमप, मुग्धा वैशंपायन यांचे गायन; तर स्वानंद किरकिरे, किशोर कदम, रिमा लागू, वंदना गुप्ते आदी कलावंत साहित्य अभिवाचन करणार आहेत. नितीन चंद्रकांत देसाई यांनी नेपथ्य व प्रकाशयोजना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेळी डॉ. नेमाडे यांचा सत्कार केला जाणार आहे.