परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील कर्मचा-यांनी वेतनवाढीच्या मुद्दय़ावर संप पुकारला होता.
मुंबई – परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील कर्मचा-यांनी वेतनवाढीच्या मुद्दय़ावर संप पुकारला होता. वेतनवाढीसह घरांची अवस्था, गणवेशाची मागणी इत्यादी मागण्या या कर्मचा-यांनी ‘द बॉम्बे सोसायटी फॉर दी प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स’सह ‘द साकराबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल्स फॉर अॅनिमल्स’ या ट्रस्टसमोर ठेवल्या आहेत. यावर ट्रस्ट प्रशासनाने ठराविक रक्कम वाढवून देण्याचे मान्य केले असले तरी घरांच्या नूतनीकरणाबाबत ट्रस्टच्या वतीने काहीच करण्यात आले नसल्याचे ‘प्रहार’च्या पाहणीत समोर आले आहे.
रुग्णांची काळजी घेण्यासाठी ड्रेसर, मुकादम, वॉर्ड बॉय आदी कर्मचारी असले तरी दस्तुरखुद्द या कर्मचा-यांचीच वाईट आहे. हे सगळे कर्मचारी येथील झोपडीवजा कॉर्ट्समध्ये राहात आहेत. घर म्हणवल्या जाणा-या या त्यांच्या झोपडीत एका माणसाला शिरायला जागा नसताना जवळपास चार ते सात माणसांचे कुटुंब प्रत्येकी खोलीत राहत आहे. या ठिकाणी पूर्वी घोडय़ांचा तबेला होता. हा तबेला हटवून या कर्मचा-यांसाठी ही वसाहत उभारण्यात आली आहे. पावसाळ्यात या घरात पाणी गळते. घरांना खिडक्या नाहीत. आहेत त्या तुटल्या आहेत. परिसरात सर्वत्र कचरा दिसतो. गेल्या दीडशे वर्षात या झोपडय़ांचे नूतनीकरणच झालेले नाही, असे हे कर्मचारी सांगतात. ही वसाहत वॉर्डनजीकच्या गल्लीतच आहे. प्रत्येक खोलीची जागा १८० चौरस फूट एवढीच आहे. अशा दाटीवाटीतच्या १७ खोल्यांत या कर्मचा-यांचे कुटुंबीय आपले जीवन कंठत आहेत. घरात दाटीवाटी असल्याने कित्येकांनी घराबाहेर चुली मांडल्या आहेत.
दुसरी वसाहत थेट प्राण्यांच्या वॉर्डच्या मागच्या भागात आहे. या ठिकाणी १२ खोल्या आहेत, परंतु या खोल्यांची अवस्था त्याहीपेक्षा वाईट आहे. या वसाहतीतील प्रत्येक खोली अडगळीची आहे. या खोल्यांसाठी केवळ दोनच संडास-बाथरूम आहेत. त्यामुळे पगारवाढीसह डोक्यावरचे छप्परही सुरक्षित करून द्या, अशी मागणी या कर्मचा-यांनी केली आहे.
घरभाडे केवळ २५० रुपये!
रुग्णालयात एकूण १५० कर्मचारी सेवेसाठी आहेत. यातील बहुतांश कर्मचा-यांचा वडिलोपार्जित व्यवसाय सुरू आहे, परंतु एवढय़ा वर्षापासून केवळ २५० रुपये भाडे रुग्णालय प्रशासन कर्मचा-यांकडून वसूल करते. जे कर्मचारी वसाहतीत राहत नाहीत, त्यांना २५० रुपये दरमहिना घराचा भत्ता दिला जातो. २५० रुपयांत मुंबईसारख्या शहरात घर भाडय़ाने मिळते का, असा सवालही कर्मचा-यांनी केला आहे.
रुग्णालयाच्या इमारती ‘हेरिटेज’अंतर्गत येतात. संपूर्ण रुग्णालयाच्या नूतनीकरणाविषयी एमएमआरडीए आणि हेरिटेज समितीकडे केस दाखल केली आहे. कर्मचा-यांना राहत्या जागी दोनमजली घरे बांधून हवी आहेत. या मागण्या रास्त नाहीत. आपत्कालीन समस्यांचा विचार करता याअगोदरच घरावर नवीन छप्पर, स्वच्छतागृहे आम्ही बांधून दिली आहेत. आम्हालाच संपूर्ण रुग्णालयाचे नूतनीकरण करायचे आहे, परंतु परवानगीअभावी बांधकाम रखडले आहे. – कर्नल जे. खन्ना, सचिव, पशुवैद्यकीय रुग्णालय