गणेश विसर्जनाची तयारी करत असताना तोल जावून पडल्याने घाटकोपर येथील गणेशभक्ताचा मृत्यू झाला.
मुंबई- गणेश विसर्जनाची तयारी करत असताना तोल जावून पडल्याने घाटकोपर येथील दत्ताराम लक्ष्मण सकपाळ या गणेशभक्ताचा मृत्यू झाला. घाटकोपर मधील पारशी वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा कार्यकर्ता आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली.
विसर्जनाची तयारी करत असताना दत्ताराम याला भोवळ आल्याने तो तोल जावून खाली पडला. त्याला तातडीने उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज डॉक्टर आणि कर्मचारी नसल्याने तुम्ही उद्या सकाळी या अशी बोळवण करत उपचार करण्यास नकार दिला. या दरम्यान दत्ताराम यांची प्रकृती आणखी खालावली आणि उपचारा करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, वेळेवर उपचार न केल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यु झाल्याचा आरोप दत्तारामच्या नातेवाईकांनी केला आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही तीव्र निषेध नोंदवत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. यामुळे येथील परिस्थिती तणावग्रस्त आहे.
घाटकोपर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.