चोरलेल्या हिरेजडीत दागिन्यातील हिरे दीड वर्षे लपवून ठेवल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तुमसर या कुबेर नगरीत आलेल्या एजंट आणि मुख्य आरोपीला तुमसर पोलिसांनी शिताफीने अटक केली.
भंडारा- धनाढ्य व्यापा-याच्या घरातून चोरलेल्या हिरेजडीत दागिन्यातील हिरे दीड वर्षे लपवून ठेवल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तुमसर या कुबेर नगरीत आलेल्या एजंटाला आणि त्याने दिलेल्या माहितीवरून मुख्य आरोपीला तुमसर पोलिसांनी शिताफीने अटक केली. विनोद मेश्राम (२२) असे एजंटाचे तर रामदयाल भास्कर गेडाम (३६) असे मुख्य आरोपीचे नाव असून, ते दोघेही चंद्रपूर येथील रहिवासी आहेत.
चंद्रपूरच्या आकाशवाणी नगरातील झोपडपट्टीत राहणारा रामदयाल गेडाम पत्नीला चंद्रपुरात सोडून कामाच्या शोधार्थ वर्धा येथे गेला. वर्धा जिल्ह्याच्या डोंगरगाव येथील बबली ऊर्फ सीमा नीलकंठ मेश्राम या तरुणीसोबत त्याचे सूत जुळले आणि तिला घेऊन तो अकोला येथे राहू लागला. बबली अकोला येथे एका धनाढय़ व्यापा-याकडे धुणी-भांडी करत होती. एक दिवस तिने व्यापा-याच्या घरातून लक्षावधी रुपये किमतीचे हिरेजडीत दागिने चोरले. ही घटना सुमारे दीड वर्षापूर्वीची आहे.
घरमालकाने बबलीवर व्यक्त केलेल्या संशयावरून, अकोला येथील खदान पोलिस ठाण्याच्या अधिका-यांनी बबली आणि रामदयालला ताब्यात घेतले होते.
त्यांच्याजवळून चोरीचा काही मालही जप्त करण्यात आला. मात्र, पूर्ण दागिने आणि त्यातील हिरे मिळाले नव्हते. दोन्ही आरोपींना या प्रकरणात शिक्षाही झाली होती. काही महिन्यांपूर्वी रामदयालचा शोध घेत ती हि-यांसह चंद्रपुरात दाखल झाली आणि चोरीचे हिरे रामदयालच्या स्वाधीन केले.
रामदयालने चंद्रपुरातील त्याचा शेजारी विनोद मेश्राम याला विश्वासात घेतले आणि दलालीचे आमिष दाखवून हि-यांची विक्री करून देण्याची गळ घातली. रामदयालकडे असलेल्या एकूण २८ हि-यांपैकी दोन खरे हिरे घेऊन विनोद मेश्राम हा २८ जानेवारी रोजी तुमसरात आला. येथील सराफांनी गुरुकृपालू ज्वेलर्सचे मालक अभिषेक कारेमोरे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. कारेमोरे यांच्याकडे हिरे विक्रीसाठी आलेल्या मेश्रामचा पेहराव, बोलीभाषा यावरून संशय आल्याने, कारेमोरे यांनी तुमसर ठाण्याचे पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. तुमसर ठाण्याच्या पथकाने कारेमोरे यांच्या सराफा दुकानातून मेश्रामला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी गेडाम याला चंद्रपूर येथे जाऊन सापळा रचला व त्याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून २८ हिरे जप्त करण्यात आले आहेत. त्या हि-यांची किंमत १७ लाख रुपये असल्याचे समजते.