अंधेरी सहार गाव येथे अंमली पदार्थ विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकास(एएनसी) मिळाली.
मुंबई – अंधेरी सहार गाव येथे अंमली पदार्थ विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकास(एएनसी) मिळाली. पथकाने सापळा रचून एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता काहीच सापडले नाही.
मात्र पोलिसांना संशय आला असता चपलेची झडती घेतली त्यावेळी नायजेरियन नागरिकाने अंमली पदार्थ चपलेत लपवून आणल्याचे समोर आले. त्याच्याकडून २२१ ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एएनसीच्या कांदिवली कक्षाचे उपनिरीक्षक सुधाकर सारंग यांना अंधेरी पूर्व येथील सहार गावात एक परदेशी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सारंग व त्यांच्या पथकाने सहार कार्गो रोड येथील बेस्ट बस थांब्याजवळ सापळा रचला.
पथकाच्या माहितीनुसार दुपारी तीनच्या सुमारास एक नायजेरीयन तेथे आला, असता सारंग व त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीत पोलिसांना काहीच सापडले नाही. पण त्याच्याकडील चपलांमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू लपवल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी चपल काढून घेतले असता त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अटक केली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत १७ लाख ६८ हजार रुपये असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.