छोटया पडद्यावर मालिकागणिक अनेक नव्या अभिनेत्री या क्षेत्रात पदार्पण करत असतात. त्यातल्या काहींना प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करता येतं. सोनी वाहिनीवर सुरू असलेली ‘अमिता का अमित’ ही मालिका आता लोकांना चांगलीच आवडू लागली आहे. या मालिकेतली साधीभोळी अमिता समस्त महिला वर्गाची फेव्हरेट होत चालली आहे. ही भूमिका साकारणा-या चांदनी भगनानीशी बोलताना जाणवलेली ही ‘अमिता’च्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडतात.
ती आली, तिनं पाहिलं व तिनं जिंकलं, असं तिच्याबाबतीत झालं नाही. ‘सोनी’वरच्या ‘अमिता का अमित’ या मालिकेतून ती आली, तेव्हा आणखी एक मालिका आली अशाच प्रकारे तिचं स्वागत झालं होतं. मात्र ही मालिका हळूहळू लोकप्रिय झाली.
प्रेक्षकांना या मालिकेतली तिची भोलीभाली ‘सुरत’ आवडायला लागली, आपल्यावर प्रेम न करणा-या नव-याच्या प्रेमासाठी आसुसलेली व ते मिळवण्याचा प्रयत्न करणारी ती संस्कारी मुलगी आपलीशी वाटू लागली. ‘अमिता का अमित’मधली अमिता म्हणजे चांदनी जेव्हा आपल्याशी बोलत असते, तेव्हा उत्साहानं भरलेल्या एका झ-याच्या काठावर बसल्यासारखं वाटतं राहतं.
बोरिवलीत लहानाची मोठी झालेल्या चांदनी भगनानीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. त्यासाठी अनेक कार्यक्रमांत ती हिरीरीने भाग घेत असे. तिच्या वडिलांच्या एका मित्राने तिला पहिल्यांदा जाहिरातीत झळकवलं तेव्हा ती सात वर्षाची होती. त्यानंतर ती वेगवेगळ्या जाहिरातीत चमकत गेली. पुढे नववीला असताना तिनं चार वर्षाचा गॅप घेतला. या काळात ती कुठेही दिसली नाही, बारावी पूर्ण करून ती नॅशनल कॉलेजमध्ये बीएमएम करू लागली. ‘अभिनयक्षेत्रात काही जमलं नाही तर किमान पत्रकार होता येईल, अशी माझी अपेक्षा होती,’ चांदनी हे वाक्य बोलते नि खळखळून हसते.
त्यानंतर अनेक मालिकांमध्ये लहान-मोठय़ा भूमिका करत चांदनीची अभिनय कारकीर्द सुरू राहिली. एकदा ‘सोनी’च्या एका मालिकेसाठी ऑडिशन सुरू असल्याचं तिच्या एका मैत्रिणीनं तिला सांगितलं. आपण ही ऑडिशन देऊ नये, असं तिला आधी वाटलं की, मात्र मैत्रिणीच्या आग्रहाखातर ती ऑडिशनला आली, तोपर्यंत या मालिकेच्या कोणत्याही कलाकाराची निवड झालेली नव्हती, ऑडिशनला चांदनीला काही संवाद देण्यात आले, आधी अभिनयाची केलेल्या चांदनीसाठी ते अवघड नव्हतं, त्यानंतर काही वेळ चर्चा करून तिला निवड झाल्याचं सांगण्यात आलं. चांदनीसाठी हा आश्चर्याचा धक्काच होता. त्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. या मालिकेचं नाव जरी ‘अमिता का अमित’ असलं तरी या अमितचा मात्र पत्ता नव्हता, त्याची निवड ही मालिका सुरू झाल्यानंतर करण्यात आली. त्यामुळे चित्रीकरणाच्या काळात अमित बिना अमिता असंच वातावरण होतं.
चांदनीला अमिताची भूमिका फार आवडते. या भूमिकेतून अभिनयाचे अनेक कंगोरे दाखवता येतात. ती म्हणते, ‘विसाव्या वर्षीच मी एका विवाहितेची भूमिका करतेय, त्यातही ही अमिता एकत्र कुटुंबपद्धतीतली सून आहे, त्यामुळे साहजिकच एका जबाबदार गृहिणीचं काम करणं थोडंसं अवघड होतं, पण माझ्याबरोबर काम करणा-या इतर कलाकारांनी मला चांगलाच पाठिंबा मिळतो. आम्ही इथे रात्रंदिवस चित्रीकरण करत असतो त्यामुळे आमच्यात एक चांगलं नातं तयार झालं आहे. आमच्या कुटुंबापेक्षाही आता हे कुटुंब आम्हाला अगदी जवळचं वाटतं. कधी कधी पडद्यावर आमच्यामध्ये काही कुरबुरीच्या, हेव्यादाव्याच्या घटना दाखवल्या जातात त्याही आम्ही फार छान एंजॉय करतो.’
‘या मालिकेत माझ्या नव-याची भूमिका करणारा अमित (निषाद वैद्य) माझा अगदी चांगला मित्र आहे. तो माझा भाऊ आहे, सखा आहे, माझा हमराज आहे, त्याच्याबरोबर काम करण्यात फारच मजा येते. आम्हाला लोकांचाही फार चांगला प्रतिसाद मिळत असतो. एकदा काम संपल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, तिथे एक वयस्कर बाई आल्या व आम्हाला म्हणाल्या, तुमचा जोडा अगदी छान दिसतोय, तुम्ही लग्न कधी करणार आहात? तेव्हा त्यांना समजावता समजावता मला नाकीनऊ आले. या मालिकेच्या लोकप्रियतेने मला लोकांच्या मनात जे स्थान मिळालं आहे ते मला सुखावणारं आहे. कोणत्याही कलाकाराचा हा एक ऊर्जास्रोत असतो.’ चांदनी सांगते.
चांदनीला इथेच थांबायचं नाही, टीव्हीवर काम करणा-या कुठल्याही अभिनेत्रीप्रमाणे तिलाही मोठय़ा पडद्यावर चमकायचंय, त्यासाठी ती आतापासूनच मेहनत घेतेय. ‘छोटय़ा पडद्यावर अजिबात काम करायचं नाही, असं ती मानत नाही. आता हे माध्यमही फार मोठं झालं आहे. मला कधी कधी अगदी अमेरिका, दुबई, यांसारख्या ठिकाणाहूनही अनेक ई-मेल येत असतात, त्यामुळे या माध्यमाची ताकदही कमी लेखता येणार नाही. या क्षेत्रात राहायचं असेल तर आपल्याला मेहनतीशिवाय पर्याय नसतो. छोटय़ा पडद्यावरच्या डेली सोपमध्ये काम करणं हे आव्हानात्मक आहेच, तितकंच ते थकवणारं आहे. मात्र त्याला जो प्रतिसाद मिळतो त्यामुळे कामाचा उत्साहही कमी होत नाही असं ती म्हणते.
सध्या ती ‘अमिता का अमित’ या मालिकेतच इतकं व्यग्र आहे की, तिला इतर कोणत्याही प्रोजेक्टचा विचारही करता येत नसल्याचं ती सांगते. आपल्या वयाच्या विसाव्या वर्षीच इतकी महत्त्वाची भूमिका मिळालेल्या चांदनीला कसलीही घाई नाही, कदाचित हाच तिचा गुण तिला भविष्यात यश मिळवून देईल.