जे.जे. उड्डाणपूलावर शनिवारी रात्री एका दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार मंगेश गावडे (५३) यांचा मृत्यू झाला.
मुंबई – जे.जे. उड्डाणपूलावर शनिवारी रात्री एका दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार मंगेश गावडे (५३) यांचा मृत्यू झाला. जे.जे.उड्डाणपूलावर दुचाकीच्या वाहतुकीला बंदी आहे.
मात्र नियम डावलून दुचाकीस्वार येथून सर्रास ये-जा करत असतात. सायन येथे रहाणारे मंगेश गावडे शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास येथून आपल्या दुचाकीवरुन भायखळयाच्या दिशेने जात होते.
अचानक त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मंगेश काही फूट अंतरावर फेकले गेले. डोक्याला फटका बसल्याने मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.
भायखळयाच्या नूर हॉस्पिटलच्या काही कर्मचा-यांनी उड्डाणपूलावरचा हा अपघात बघितला. त्यांनी लगेचच पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी लगेचच मंगेश गावडे यांना जे.जे.रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. गावडे यांनी त्यांचे हेल्मेट बाईकच्या हॅण्डलला अडकवले होते. हेल्मेट घातले असते तर, कदाचित त्यांचा जीव वाचला असता.