ज्येष्ठ पत्रकार, लेखक अशोक जैन यांचे मंगळवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
मुंबई- ज्येष्ठ पत्रकार, लेखक अशोक जैन यांचे मंगळवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. अंधेरीतील ब्रह्मकुमारी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी लेखिका सुनीती जैन, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर रात्री उशिरा ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
नामांकित पत्रकार म्हणून नावलौकिक असलेल्या जैन यांनी १९६६ मध्ये दैनिक महाराष्ट्र टाइम्समधून पत्रकारितेची सुरुवात केली. १९७८ मध्ये त्यांची दिल्लीत विशेष प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली. १९७८ ते १९८९ या काळातील आपल्या राजधानीतील ११ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यानंतर मुंबईत या वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून काम करताना आपली जबाबदारी समर्थपणे निभावली.
जैन यांनी पत्रकारितेबरोबरच अनेक पुस्तकांचे लिखाण केले. अनेक गाजलेल्या इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करून जैन यांनी उच्च दर्जाचे अनुवादक म्हणूनही नावलौकिक मिळवला होता. जैन यांचे ‘कानोकानी’ हे सदर वाचकांमध्ये लोकप्रिय झाले होते. ‘वॉकिंग विथ लायन’ या त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद पूर्ण झाला असून प्रकाशनाच्या वाटेवर आहे.