वीस वर्षापूर्वी आलेल्या महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ या चित्रपटाचा ‘झपाटलेला २’ हा सिक्वेल ७ जून रोजी प्रदर्शित होत आहे.
मुंबई – वीस वर्षापूर्वी आलेल्या महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ या चित्रपटाचा ‘झपाटलेला २’ हा सिक्वेल ७ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून महेश कोठारे, रामदास पाध्ये हे पुन्हा एकदा बोलक्या बाहुल्यांची ही जादू दाखवायला सज्ज झाले आहेत.
हा चित्रपट मराठीतला पहिला थ्री-डी चित्रपटही ठरला आहे.सोमवारी या चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली. या चित्रपटाचे प्रदर्शन व्हायकॉम १८ ही कंपनी करणार असून त्यांच्याच ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटाबरोबरच ‘झपाटलेला’चे प्रोमो दाखवण्यात येणार आहेत. जुन्या चित्रपटातला ‘तात्या विंचू’ हा बाहुला शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांच्या कलेमुळे आणि दिलीप प्रभावळकरांच्या आवाजामुळे गाजला होता.
आताचा थ्री-डी तात्या विंचू हा पहिल्यापेक्षाही अधिक भीतीदायक असेल, असे रामदास पाध्ये यांनी सांगितले. या चित्रपटाच्या माध्यमातून बोलक्या बाहुल्यांच्या प्रयोगात पहिल्यांदाच रेडिओ आणि रिमोट कंट्रोलचा वापर करण्यात आला आहे. जुन्या चित्रपटातील तात्या विंचू कसा जिवंत होतो हे पाहणे मनोरंजक असल्याचे कोठारे म्हणाले.
या चित्रपटासाठी खास स्पेनवरून थ्री-डी कॅमेरा व तंत्रज्ञांना बोलावण्यात आले होते. झपाटलेल्या या चित्रपटातली शब्दभ्रमकाराची भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अजरामर केली होती. झपाटलेला २ मध्ये त्यांच्या मुलाची भूमिका अदिनाथ कोठारे करत आहेत तर नायिकेच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी झळकणार आहे. चित्रपटांत विजय पटवर्धन, मकरंद अनासपुरे यांच्याही विशेष भूमिका आहेत.