२६/११ हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली याची माफीचा साक्षीदार करण्याची विनंती स्थानिक सत्र न्यायालयाने मान्य केली आहे.
मुंबई- २६/११ हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली याची माफीचा साक्षीदार करण्याची विनंती स्थानिक सत्र न्यायालयाने मान्य केली आहे. आपल्याला माफी दिल्यास आपण सर्व सांगू, असे त्याने न्यायालयाला सांगितले होते. त्याला सरकारपक्षाचा साक्षीदार म्हणून मान्य करण्यात आले आहे. मात्र त्याला सत्र न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. अमेरिकन न्यायालयात हेडलीने दिलेली माहिती संपूर्ण उघड करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्याच्या या प्रस्तावावर तपास अधिका-यांशी विचारविनिमय करण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डेव्हिड हेडलीला गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आले. तेव्हा त्याने हा प्रस्ताव दिला.
२६/११ हल्ल्याचा कट रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या पाकिस्तानी अमेरिकन वंशाच्या डेव्हिड हेडलीला अमेरिकेने ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली असून तो तुरुंगातच आहे. २०१० मध्ये हेडलीची चौकशी करण्याची राष्ट्रीय तपास संस्थेला परवानगी देण्यात आली होती.
२००७ आणि २००८ दरम्यान हेडलीने मुंबईत अनेक वेळा येऊन हल्ल्यांच्या ठिकाणांची टेहळणी केली होती. पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसण्यास त्याच्या व्हीडिओ चित्रफितीची मदत झाली होती.
कोण आहे हेडली?
२६/११ हल्ल्यांचा सूत्रधार डेव्हिड हेडली हा पाकिस्तानी वडील आणि अमेरिकन आई यांच्यापोटी १९६० मध्ये जन्मला. दाऊद गिलानी ऊर्फ डेव्हिड कोलमन हेडलीने आपले बालपण पाकिस्तानात व्यतीत केले. त्याचे आई-वडील विभक्त झाले तेव्हा डेव्हिड अमेरिकेत गेला. हेडलीने न्यूयॉर्कमध्ये व्हीडिओ स्टोअर चालवले.
लाहोरमधील क्वादिसिया मशिदीत त्याने भेट दिली तेव्हा भारतात जिहाद पुकारण्यासाठी लष्कर-ए-तोयबाच्या पोस्टरने प्रभावित झाला. २६/११ हल्ल्यांचा मास्टरमाईंड हाफीझ सईद यालाही तो भेटला. २००२ ते २००४ या दरम्यान त्याने तोयबाच्या प्रशिक्षण शिबिरांना हजेरी लावली.
२००६मध्ये तो मुंबईत आला तेव्हा त्याने महापालिका मुख्यालय, गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज, अपोलो बंदर, पोलीस मुख्यालय आदी इमारतींची चित्रफीत घेतली. तिचाच उपयोग हल्ल्यासाठी करण्यात आला.