मुंबईकरांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांत डायलेसिसची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पालिकेतील सत्ताधा-याने करत वाहवा मिळवली होती.
मुंबई – मुंबईकरांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांत डायलेसिसची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पालिकेतील सत्ताधा-याने करत वाहवा मिळवली होती. मात्र डायलेसिस सेंटर बनवण्याचे प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजूर होऊनही अद्याप काही रुग्णालयांमध्ये हे सेंटर सुरू झालेले नाही.
महापालिकेच्या १४ उपनगरीय रुग्णालयांमध्ये खासगी संस्थांच्या वतीने डायलेसिस सेंटर्स सुरू होणार होते. पण, त्यापैकी गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालय, गोवंडीतील मदनमोहन मालवीय, जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, जुहू कुपर रुग्णालय, सांताक्रूझ व्ही. एन. देसाई, चेंबूर मा रुग्णालय, विक्रोळी महात्मा फुले, मुलुंड एम. टी. अगरवाल, कुर्ला भाभा आदी रुग्णालयांमध्ये ही डायलेसिसची सेवा सुरू झालेली नाही.
मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये डायलेसिस सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा दोन वर्षापूर्वी झाली. तेव्हापासून डायलेसिस सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयवगळता कुठेही डायलेसिस सेंटर सुरू नाहीत. महापालिकेने अनेक सामाजिक संस्थांना डायलेसिस सेंटर चालवण्यासाठी दिले आहेत.
त्यात मुलुंडमधील एम. टी. अगरवाल रुग्णालय येथे हेमोडायलेसिस सेंटर चालवण्यासाठी जितो मुंबई घाटकोपर चॅप्टर यांना संपूर्ण धर्मादाय तत्त्वावर देण्यात आले होते. या संस्थेने २०० प्रति रुग्ण या दराने निविदा भरली होती. परंतु २५ जुलै २०१३ पासून चार वेळा स्मरणपत्रे पाठवूनही या संस्थेने डायलेसिस सेंटर सुरू करण्यास समर्थता दर्शवलेली नाही.
जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरू करण्यासाठी जागा निश्चितही झाली आहे. याठिकाणी वी. डी. जैन यांची डायलेसिस सेंटर प्रकल्प चालवण्यासंदर्भात निवड झाली असून त्यांनीही अद्यापही हे सेंटर सुरू केलेले नाही.
गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयात खासगी लोक सहभाग प्रकल्पांतर्गत रेहबर फाऊंडेशन अल बरकत मलिक मोहम्मद ईस्ताम इग्लिश स्कूल, कुर्ला या संस्थेस डायलेसिस चालवण्यास दिले असून, आतापर्यंत या संस्थेचे इंटेरियरचे कामच सुरू आहे. जुहूमधील कुपर रुग्णालयात वीरा देसाई श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ यांना मे २०१४मध्ये काम देऊनही अद्यापही हे सेंटर सुरू झालेले नाही. महापालिकेच्या १४ रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येणा-या डायलेसिस सेंटरची माहितीच वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली.
डायलेसिस सेंटर रखडलेली रुग्णालये आणि संस्था
सिद्धार्थ रुग्णालय, गोरेगाव : जय सद्गुरू महिला मंडळ
मदनमोहन मालवीय रुग्णालय, गोवंडी : रेहबर फाऊंडेशन अल बरकत मलिक मोहम्मद ईस्ताम इग्लिश स्कूल, कुर्ला
बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, जोगेश्वरी :
व्ही. डी. जैन
कुपर रुग्णालय, जुहू : वीरा देसाई श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ
व्ही. एन. देसाई रुग्णालय, सांताक्रूझ : नर्गिस दत्त फर्नाडिस
मा रुग्णालय, चेंबूर : सुराणा चॅरिटेबल ट्रस्ट
महात्मा फुले, विक्रोळी : जीवनज्योत ट्रस्ट
एम. टी. अगरवाल रुग्णालय, मुलुंड : जीतो मुंबई घाटकोपर चॅप्टर
भाभा रुग्णालय, कुर्ला : लेबर फाऊंडेशन
निविदेलाच प्रतिसाद नाही
घाटकोपरमधील संत मुक्ताबाई रुग्णालयात डायलेसिस सेंटर चालवण्यास देण्यासंदर्भात निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु या निविदेला प्रतिसादच मिळाला नसल्यामुळे हे सेंटर सुरू झालेले नाही, तर मुलुंडमधील वि. दा. सावरकर रुग्णालयात जागाच नसल्यामुळे हे सेंटर सुरू करण्याबाबत विचार केला नसल्याचे नागदा यांनी स्पष्ट केले.