‘डॉ. प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो’या चित्रपटाची चित्रफीत चोरी झाल्याप्रकरणी दिग्दर्शीका समृद्धी पोरे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
मुंबई- ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे, द रियल हिरो’या चित्रपटाची चित्रफीत चोरी झाल्याप्रकरणी दिग्दर्शीका समृद्धी पोरे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा व कॉपी राईट कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या चित्रपटाच्या प्रती सध्या मोबाईलवर उपलब्ध झाल्या असून तक्रारीनुसार, सेसॉर बोर्डाला देण्यात आलेल्या प्रति या बाजारात उपलब्ध झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या निर्माता व दिग्दर्शिकांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणाच्या तपासाला सुरूवात केल्याची माहिती उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ४५ व कॉपी राईट कायद्याचा कलम ६६ अंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुलातील सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर व त्यांच्या समाजकार्यावर आधारीत या चित्रपटात ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर यांनी प्रकाश आमटे यांच्या भूमिका साकारली आहे. याशिवाय सोनाली कुलकर्णी व मोहन आगाशे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.