आलिशान आणि अत्याधुनिक ‘बोइंग 787 ड्रीमलायनर’ दोन महिन्यांत महिला वैमानिकांच्या हाती देण्यात येणार आहे.
मुंबई- आलिशान आणि अत्याधुनिक ‘बोइंग 787 ड्रीमलायनर’ दोन महिन्यांत महिला वैमानिकांच्या हाती देण्यात येईल, असे ‘एअर इंडिया’चे कार्यकारी संचालक (परिचालन) आणि ज्येष्ठ वैमानिक अतुल सोमण यांनी ‘प्रहार’ला सांगितले.
56 वैमानिकांनी हे विमान चालवण्यासाठी सिंगापूरमध्ये ‘सिम्युलेटर’वर प्रशिक्षण घेतले आहे. या विमानाला मुंबई ते लंडन थेट प्रवासाला पाठवण्याआधी वैमानिक आणि सह वैमानिकांना ‘लँडिंग’चे प्रशिक्षण मुंबई-दिल्ली, दुबई आणि सिंगापूरपर्यंतच्या प्रवासात देण्यात येईल. नंतर या विमानाची वारी मुंबई ते लंडन विनाथांबा होईल.
‘ड्रीमलायनर’ भारतात नेण्यासाठी ते ‘एअर इंडिया’चे ज्येष्ठ वैमानिक कॅ. ए. एस. सोमण व कॅ. सिंग यांच्याकडे बोइंगने सुपूर्द केले. तत्पूर्वीच ते चालवण्यासाठी काही ज्येष्ठ वैमानिक आणि सहवैमानिकांचे प्रशिक्षण सिंगापूरमध्ये सुरू झाले होते. ‘एअर इंडिया’ व्यवस्थापनातील 28 वैमानिकांना ‘कमांडर’ पदाची आणि ‘इंडियन एअरलाइन्स’मधील 28 वैमानिकांना त्याच्या सहवैमानिकपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. प्रत्येक विमानासाठी एकूण पाच ते आठ वैमानिक आणि सहवैमानिकांचे गट लागतील. वैमानिक आणि सहवैमानिकांचे गट तयार झाल्यानंतर त्यांना सिंगापूरमध्ये एक महिना ‘आभासी विमान’ (सिम्युलेटर) प्रशिक्षण देण्यात आले. याव्यतिरिक्त ‘केबिन क्रू’चेही स्वतंत्र प्रशिक्षण सुरू होते. वैमानिक, सहवैमानिक आणि केबिन क्रू यांना एकत्र प्रशिक्षण देण्याची टक्केवारी जेमतेम पाच टक्के असून येत्या एकदोन महिन्यांत ‘ड्रीमलायनर’चे पहिले उड्डाण मुंबई ते दिल्ली किंवा दुबई आणि सिंगापूर मार्गावर होणार आहे.
वैमानिक आणि सहवैमानिकांनी ‘सिम्युलेटर’वर प्रशिक्षण घेतले तरी महत्त्वाचे असते ते सुरक्षित लँडिंग. यासाठी वैमानिकाकडे अनुभव, कुशलता, अचूकता आणि बिनचूक निर्णय हे गुण असावे लागतात. या सर्व गुणांची कसोटी त्याच्या पहिल्या प्रवासी उड्डाणात लागणार आहे. या सर्व गुणांच्या कसोटीला उतरणाऱ्या वैमानिकांनाच कायम ‘ड्रीमलायनर’ देण्यात येईल. देशांतर्गत आणि दुबई-सिंगापूपर्यंत प्रवाशांसह उड्डाण करण्यासाठी एअर इंडियाच्या 16 ‘एक्झिक्युटिव’ आणि ‘इंडियन एअरलाइन्स’च्या 16 अशा एकूण 32 वैमानिक-सहवैमानिकांच्या ताफ्याचे ‘लँडिंग’ प्रशिक्षण लवकरच सुरू होणार आहे. यात ज्येष्ठ महिला वैमानिकांचाही समावेश असून ‘इंडियन कमर्शियल पायलट्स असोसिएशन’च्या काही महिला ‘कमांडर’ वैमानिकांनाही सहवैमानिक म्हणून संधी मिळेल.