मतदान प्रक्रिया आटपून मतदान केंद्रातील कर्मचा-यांसह परतत असताना माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून मतदान पथकातील कर्मचा-यांवर गोळीबार केला.
गडचिरोली- मतदान प्रक्रिया आटपून मतदान केंद्रातील कर्मचा-यांसह परतत असताना माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून मतदान पथकातील कर्मचा-यांवर गोळीबार केला. यात सजन भारती हा एक पोलिस गंभीर जखमी झाला. त्याला हेलिकॉप्टरने नागपूरला हलवण्यात आले. ही घटना १५ ऑक्टोबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
घोटजवळील मक्केपल्ली मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया दुपारी ३ वा. आटोपली. त्यानंतर पोलिस जवान मतदान पथकातील कर्मचा-यांना घेऊन पायी चापलवाडा गावाकडे येत होते. दरम्यान, मक्केपल्ली व चापलवाडा गावामध्ये असलेल्या नाल्याजवळ माओवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवला. यात सजन भारती हा सीआरपीएफचा जवान गंभीर जखमी झाला. या वेळी माओवाद्यांनी गोळीबारही केला. मात्र पोलिसानी प्रत्युत्तर देताच माओवादी जंगलात पसार झाले.
एटापल्ली तालुक्यातील ताडपल्ली येथे विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्राजवळ माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे तेथील मतदान प्रक्रिया बंद करावी लागली. ताडपल्ली मतदान केंद्र माओवाद्यांनी प्रभावित असल्याने तेथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारी एक व्यक्ती मतदान केंद्रावर आली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची विचारले असता त्याने आपण माओवादी असून आपल्याकडे शस्त्र असल्याचे सांगितले. त्यानंतर तो पोलिसांना शंभर कि.मी. अंतरावर घेऊन गेला. तेथे दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.
पोलिसानी प्रत्युत्तर देताच माओवादी जंगलात पळून गेले. ही चकमक दहा मिनिटे चालली. यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली. परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली. तसेच त्या परिसरातील मतदान पथकातील कर्मचा-यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. धानोरा तालुक्यातील चिंगली फाटानजीक सीआरपीएफच्या जवानांनी दोन माओवाद्यांना पकडले असल्याचे समजते. तसेच दोन स्फोटक बाँब सापडल्याची माहिती मिळाली.