आजच्या धकाधकीच्या आयुष्यात मनावर ताण हा असतोच. ब-याचदा हा ताण असह्य होतो आणि मग औषधोपचारांची मदत घ्यावी लागते.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात मनावर ताण हा असतोच. ब-याचदा हा ताण असह्य होतो आणि मग औषधोपचारांची मदत घ्यावी लागते. जपानमधील नोकरी करणा-या अनेक लोकांना असा ताण जाणवतो. पण औषधोपचार घेण्यासाठी आवश्यक तो वेळ त्यांना देता येत नाही. त्यामुळे औषधोपचार घेता येत नाहीत. परिणामी मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या व्याधींनी ते ग्रासले जातात.
यावर जपानमधील एका दवाखान्यात एक उपाय शोधण्यात आला आहे. या उपायाद्वारे ताण कमी करण्याचं औषध ताणग्रस्त व्यक्तीच्या शिरेत थेट थेंब थेंब सोडलं जातं. या प्रक्रियेला अवधी दहा ते पंधरा मिनिटे लागतात. या वेळात रुग्ण आजूबाजूच्या लोकांशी बोलत छान वेळ घालवतो आणि हे वातावरण तसंच औषधाचा परिणाम या दोन्हींमुळे तो तणावमुक्त होतो, तेही अगदी थोडय़ा अवधीत.
टोकियो येथील ‘टेंटेकी १०’ नावाच्या एका दवाखान्यात ताणमुक्त होण्याची ही नवी पद्धत शोधून काढली आहे. जपानी नोकरदार मंडळींना हा दवाखाना म्हणजे वरदानच वाटू लागले आहे. कारण इथे होणा-या उपचारांना अगदी कमी वेळ लागत असल्याने अगदी कामाच्या दिवशीही थोडा वेळ काढून तिथे जाता येतं. लंच ब्रेकमध्ये किंवा काम संपल्यानंतर घरी जाताना या दवाखान्यात उपचार घेता येतात.
ब्रिटनमधील टेलिग्राफ या वृत्तपत्रात या दवाखान्याविषयी सविस्तर माहिती प्रकाशित झाली आहे. या दवाखान्याचे प्रमुख डॉ. र्युजी यासुमुरा हे आहेत. त्यांनी सांगितलं की, लोक ऑफिसमध्ये खूप उशिरापर्यंत आणि काम पूर्ण करण्याच्या तणावाखाली काम करतात. त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. मग ते नराश्याचे शिकार होतात.
सध्याच्या काळात ताण आणि दबाव वाढत आहेत. पूर्वीच्या काळी मसाज आणि विटॅमिनच्या गोळ्या यांनी काम भागत असे. पण आता त्यांचाही फारसा उपयोग होत नाही, असं दिसतं. पण या ‘आयव्ही ड्रीप्स’ म्हणजे शिरेत थेंब थेंब औषध सोडण्याचा उपाय आता यशस्वी ठरतो आहे. लोकांना बरं वाटतं आणि रोगापासून बचावही होत आहे. जपानी लोक अतिशय कष्टाळू आहेत.
वर्षातील १७८० तास हे लोक काम करतात. म्हणजे आठवडय़ाला जवळजवळ ३४ तास. यात अर्थातच ‘ओव्हरटाइम’ धरलेला नाही. तो धरला तर कामाचे तास आठवडय़ाला ६० तासांपेक्षा वर जातात. आणि हा ओव्हरटाइम बिनपगारी असतो. दरवर्षी साधारण जपानी कामगार आठ पगारी सुट्टय़ा घेतो. तेच फ्रेंच लोक वर्षाला ३४ दिवसांची सुट्टी घेतात. डॉ. यासुमुरा सांगतात की, या उपचारात सुरुवातीला ५० सीसी विटॅमिनयुक्त ग्लुकोज सोल्युशन दिलं जातं. रुग्णावर त्याचे चांगले परिणाम लगेच दिसू लागतात. पण तो पूर्ण बरा होण्यास एक दिवस लागतो.