अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी तुषार जाधव याच्या धावत्या लोकलमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
नवी मुंबई- अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी तुषार जाधव याच्या धावत्या लोकलमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. एक जण सानपाडा येथे तर दुसरा आरोपी वाशी रेल्वे स्थानकाबाहेर सापडला. चोरीच्या उद्देशाने या आरोपींनी ही हत्या केल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केला.
रत्नागिरी येथील महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा तुषार जाधव हा १२ जून रोजी ऐरोली येथे घरी जात असताना घणसोली येथे लोकलमध्ये त्याच्यावर दोन जणांनी हल्ला केला होता. यात तुषारचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चार पथके बनवून आरोपींचा पकडण्यासाठी सापळा रचला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने पोलिस आरोपीचा शोध घेत होते. अखेर एक आरोपी सानपाडा परिसरात असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तात्काळ जयंत बाबुल सोम उर्फ राजा हिंदू (२१) या आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर त्याचा सहकारी माधव नकुल सरकार (२२) हा दुसरा आरोपी वाशी रेल्वे स्थानकाबाहेर झोपलेला असताना पकडला गेला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिली. या आरोपींचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी सानपाडा, घणसोली, कोपरखैरणे, वडाळा येथे तपास केला.