कफ परेड येथील ताज प्रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलजवळ वसलेल्या मच्छीमार वसाहतीतील कोळी बांधवांचा रस्ता येथील टॉवरवाल्यांनी अडवला आहे.
मुंबई – कफ परेड येथील ताज प्रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलजवळ वसलेल्या मच्छीमार वसाहतीतील कोळी बांधवांचा रस्ता येथील टॉवरवाल्यांनी अडवला आहे. कफ परेड रेसिडेन्स असोसिएशनने येथील शिवशास्त्री मच्छीमार नगर क्रमांक ५ मध्ये जाणारा रस्ता बंद केल्याने मुंबईचे आद्य नागरिक आणि भूमिपूत्र असलेल्या कोळीबांधवांना स्वत:च्याच घरात जाणे अशक्य झाले आहे. त्यामुळे या परिसरात राहणारे कोळीबांधव आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
कफ परेड येथील ताज प्रेसिडेन्सी हॉटेल व बेबी मरिना उद्यानाशेजारी शिवशास्त्री मच्छीमारनगर क्रमांक पाच वसलेले आहे. या वसाहतीमध्ये सुमारे चार हजार कोळीबांधवांची कुटुंबे राहत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून कफ परेड रेसिडेन्स असोसिएशनने वाहनतळासाठी राखीव असलेला नगर भू क्रमांक १०५ बंद केला आहे. या भूखंडाचा वापर कोळी बांधव जाळी विणणे, नौका शाकारणे तसेच ये-जा करण्यासाठी करत असत. परंतु असोसिएशनने हा रस्ता बंद केल्याने कोळीबांधवाना घरी जाणे अशक्य झाले आहे. या मार्गाला बेबी मरिना उद्यानाजवळून असलेला पर्यायी मार्ग यापूर्वीच बंद करण्यात आल्यामुळे कोळीबांधवांची कोंडी झाली आहे. हे दोन्ही मार्ग बंद झाल्यामुळे येथील नागरिकांना ये-जा करण्यास रस्ताच नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
घरी जाण्यासाठी कोळीबांधवांचे रस्तेच बंद झाल्यामुळे येथील नागरिकांनी थेट महापालिकेत धाव घेतली आहे. मात्र आयुक्तांची भेट होऊ न शकल्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र आबेरकर यांच्याकडे कैफियत मांडून साकडे घातले. कोळी बांधव हे मुंबईतील भूमिपूत्र असून त्यांचा रस्ता कोणी अडवू नये. त्यामुळे परिमंडळ एकचे उपायुक्त वसंत प्रभू यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील, असे आंबेरकर यांनी सांगितले. मात्र ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात असून उद्यानाची जागा महापालिकेने असोसिएशनला भाड करारावर दिली आहे. हे भाडेकरारही संपुष्टात आले असल्यामुळे त्यावर निश्चितच तोडगा काढून कोळीबांधवांना न्याय दिला जाईल, असे आंबेरकर यांनी सांगितले.