नवरात्र उत्सव एक दिवसावर येऊन ठेपलाय आणि सोशल मीडियावर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाचे वस्त्र घालायचे? याचे मॅसेजेस फिरू लागले आहेत.
मुंबई- नवरात्र उत्सव एक दिवसावर येऊन ठेपलाय आणि नवरात्र मंडळ, गरबा खेळण्यासाठी लहानग्यांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांचीच जोरदार तयारी सुरू आहे. यामुळे तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुला-मुलींनी गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी आपले ग्रुप तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाचे वस्त्र घालायचे? याचे मॅसेजेस फिरू लागले आहेत. कोणत्या दिवशी कोणते कपडे घालायचे, कोणत्या मैदानात गरबा खेळायला जायचं.. याच्या आयोजनात सध्या तरुणाई व्यस्त झालेली दिसत आहे. नवरात्रीच्या या उत्सवात तरुणाईचं विशेष आकर्षण असतं ते, दांडिया! तरुणाई दांडिया-रासला जास्त पसंती देतात.
लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वाचा नवरात्रीचा एक दिवस हा दांडिया खेळण्यासाठी असतो. म्हणूनच, दांडियाप्रेमींसाठी बाजारात सध्या दांडिया उपलब्ध झाल्या आहेत. लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वाना आवडतील अशा आकर्षक व रंगीबेरंगी दांडिया बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. लहान मुले दांडिया खेळत नसले, तरी त्यांनाही दांडियाचे वेगळे आकर्षण असते. लहान मुलांना गुजराती पेहराव घालून हातात दांडिया देऊन मैदानात दांडिया खेळण्यासाठी पालक घेऊन येतात. लहान मुलांसाठी कलर दांडिया, सकडा दांडिया, बाननी दांडिया, साटण दांडिया, रेडिअम नागमणी दांडिया, अॅल्युमिनिअम डिस्को दांडिया यांसारख्या दांडिया उपलब्ध आहेत तर, बेरिंग दांडिया, स्टील रॉड दांडिया व स्टील पाईप दांडिया या प्रकारच्या दांडिया मोठय़ांसाठी उपलब्ध आहेत. रात्री अंधारात चमकणारा रेडिअम नागमणी दांडिया लहान मुलांना आकर्षित करणारा दांडिया आहे. लहान मुलांसाठी असणा-या दांडिया आकाराने लहान असतात व तरुणांसाठीच्या दांडिया या आकाराने मोठय़ा असतात. भडक रंगाचे, भारताच्या ध्वजाच्या रंगासारखे, सिल्व्हर रंगाची चमकदार पट्टी असलेले, काळ्या रंगावर डिझाईन असलेले आकर्षक दांडिया तसेच, वजनाने जड व हलके दांडिया दांडियाप्रेमींसाठी उपलब्ध झाल्या आहेत. लाकूड, अॅल्युमिनिअम व स्टीलने बनलेल्या दांडिया ही बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. नवरात्रोत्सवात दांडिया खेळल्याशिवाय तरुणांची नवरात्री संपन्न काही होत नाही.
शाळेत किंवा कॉलेजमध्ये दांडिया रासचा कार्यक्रम सध्या आयोजित केला जातो. तरुणाईही दांडिया खेळाला पसंती देतात. त्यामुळे दांडियाची मागणी जास्त आहे. वेग-वेगळ्या रंगात व प्रकारात दांडिया उपलब्ध असल्याने दांडियाप्रेमी खूश आहेत. – ललित पटवा, दांडिया विक्रेता