अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास संथगतीने सुरू असल्याबद्दल तपास पथकांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा फटकारले आहे.
मुंबई- अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास संथगतीने सुरू असल्याबद्दल तपास पथकांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा फटकारले आहे.
येत्या २३ जूनपर्यंत या दोन्ही हत्येच्या तपासात काय प्रगती झाली, याचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटीला दिले आहेत.
दाभोलकर हत्येच्या तपासाचा अहवाल सीबीआयने तर पानसरे यांच्या हत्येचा तपास सीआयडीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या पीठासमोर सादर केला.
त्यावर सुनावणी करताना न्या. धर्माधिकारी म्हणाले की, या दोन्ही हत्यांचा तपास करताना कोणाचा दबाव येत आहे का? तसा दबाव असेल तर त्याचीही माहिती न्यायालयात द्या. या हत्यांचा तपास समाधानकारक नाही. मात्र, आता तरी तपास यंत्रणा तपासात प्रगती करतील, अशी आशा वाटते.
या महत्त्वाच्या प्रकरणात तपास यंत्रणांनी वेगवान काम करणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या तपास यंत्रणांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. या तपास यंत्रणांनी पीडितांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत राहावे, असे न्यायालयाने सुचवले.
सरकारी वकील संदीप शिंदे यांनी सीआयडीची बाजू मांडताना सांगितले की, आम्ही पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाड यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
दाभोलकर यांची ऑगस्ट २०१३ मध्ये हत्या झाली होती. तर पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये गोळीबार केला होता. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले होते. दरम्यान, सीबीआयने न्यायालयात सांगितले की, दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात आम्ही सतानत संस्थेचा तपास करत आहोत.