दिवाळी साजरी झाली. दीपोत्सवाच्या प्रकाशाने काही उजेडाच्या दिशा नक्कीच गवसल्या असतील. अंधार दूर सारून प्रकाशमार्ग दाखवणा-या दिवाळीनंतर वेगवेगळ्या कलादालनांमध्ये भरणारी प्रदर्शनेही अशीच उजेड दाखवणारी ठरणार आहेत. नेहमीप्रमाणे त्यात वैविध्य असणार आहेच. त्यातही सामाजिक बांधीलकीचे भान आहे. कलावंतांचा मेळावा आहे आणि निसर्गाने दिलेली ऊर्जाही अनुभवायला मिळणार आहे. ही आशावादी ऊर्जा दीपोत्सवानंतरचा एक लख्ख उजेड म्हणून आपण सारे अनुभवू या!
जीवनाच्या सर्वागांना स्पर्श करणारे आणि कलाजगताचे ख-या अर्थाने प्रतिनिधित्व करणारे ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे पाचवे प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, ते २९ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे.
देश-विदेशातील वेगवेगळी कलादालने या प्रदर्शनात सहभागी होत असून, ३००हून अधिक कलावंतांच्या कलाकृतींचा आगळा वेगळा उत्सवी सोहळा अनुभवण्याची संधी कलारसिकांना मिळणार आहे. या महोत्सवाचे आयोजन राजेंद्र पाटील यांनी केले आहे.
चित्रकला, शिल्पकला, चित्रआलेख यांचा संगम असलेल्या या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनात तैलरंग, अॅक्रिलिक, मिक्स मीडिया, जलरंग, चारकोल अशा रंगांबरोबरच ब्रांझ, संगमरवर अशा विविध माध्यमांचा वापर करून साकार झालेल्या कलाकृती पाहता येणार आहेत.
देशभरातील आणि विदेशातीलही प्रतिथयश कलाकार आणि कलादालनांनी या प्रदर्शनात भाग घेतला आहे. या वर्षी नेहरू सेंटर कलदालनाच्या तळमजल्यावर वेगवेगळ्या कलादालनांनी मांडलेले कलाप्रकार पाहता येतील आणि वरच्या मजल्यावर स्वतंत्र कलाकारांची कला प्रदर्शित केली जाणार आहे.
नेहरू सेंटरमधल्या १५० वातानुकूलित बुथवर ३००च्या वर कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात प्रदर्शित होत आहेत. भारतातील वेगवेगळ्या शहरांसोबतच सिंगापूर, स्वित्झर्लंडलड, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती व म्यानमार अशा भारताबाहेरील महत्त्वाच्या ठिकाणचे पन्नास शहरांमधले २०० संबंधित कलाकार आणि ४० कलादालने या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.
गेल्या चार प्रदर्शनात अनेक विषयांवर परिसंवाद आयोजित केले गेले होते, या वर्षी दोन सुप्रसिद्ध समकालीन कलाकार अतुल दोडिया आणि बैजू प्रधान हे ‘क्रिएटिव्ह मोनोलॉग’ सादर करणार आहेत. मुंबई बरोबरच नवी दिल्लीमध्येही जानेवारी २०१६मध्ये ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येणार आहे.
या कला जत्रेचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पाटील (उपाध्यक्ष, बॉम्बे आर्ट सोसायटी आणि इंडियन कॉन्टेम्पररी आर्ट जनरल या त्रमासिकाचे संपादक) यानी २०११ साली या सोहळ्याची सुरुवात केली आणि त्याला नावारूपाला आणले. कलाक्षेत्रातील कला वितरक, कलादालने, कलाकार, कला संग्राहक आणि खरेदीदार या विविध क्षेत्रांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम या जत्रेच्या माध्यमातून केले जात आहे.
या प्रदर्शनात भाग घेणा-या कलादालनात आकृती आर्ट गॅलरी (कोलकाता), अनिहा कला दालन (नवी दिल्ली), आर्ट देश (मुंबई), आर्ट गॅलरी १० (मुंबई), आर्ट कन्सल्टंट (नवी दिल्ली), आर्टक्वेस्ट (मुंबई), आर्ट रिव्होलुशन (मुंबई), सेलियन आर्ट गॅलरी (चेन्नई), कॉसमॉस आर्ट गॅलरी (पुणे), डोलना द मूव्हमेंट (मुंबई), एक्सटॅसी आर्ट गॅलरी (मुंबई), गॅलरी आर्ट एटेम (नवी दिल्ली), गॅलरी रुकी (नवी दिल्ली), गॅलरी स्प्लाश (नवी दिल्ली), गॅलरी एंडलेस थॉट्स (फरिदाबाद), गॅलरी पायोनियर (नवी दिल्ली), गॅलरी वायएसइरा (इंदूर), ग्नानी आर्ट्स (सिगापूर), हुनर शोकेसिंग आर्ट (नवी दिल्ली), इम्प्रेशन आर्ट गॅलरी (मुंबई), क्वेस्ट गॅलरी (मुंबई), कलादृष्टी आर्ट फाऊंडेशन (सोलापूर), किरसानोव्ह फोटोग्राफी, (स्वित्झर्लंडलड), लावण्य आर्ट गॅलरी (नवी दिल्ली), मॅनमार इंक आर्ट गॅलरी (दुबई), पद्माज आर्ट गॅलरी (मुंबई), पेंटेड -हिदम गॅलरी (मुंबई), सेगर गॅलरी (कोलंबो), स्टुडिओ सेवन (नवी दिल्ली), सनिविध (जयपूर), ताओ आर्ट गॅलरी (मुंबई), द लेक्सिकॉन (नवी दिल्ली) व्हिजन आर्ट (नवी दिल्ली) यांसारख्या कलादालनांचा समावेश आहे.
अंध, मूकबधिरांच्या मदतीसाठी छायाचित्र प्रदर्शन!
मुंबई येथील प्रसिद्ध छायाचित्रकार प्रवीण खंडेलवाल यांच्या निसर्गरम्य विविध छायाचित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये १८ नोव्हेंबरपासून सुरू झाले असून, ते २४ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. सदर छायाचित्रांच्या विक्रीतून जमा होणारा निधी अंध व मूकबधिर मुलांसाठी कार्यरत असलेल्या हेलेन केल्लेर या संस्थेस देण्यात येणार आहे.
प्रवीण खंडेलवाल यांनी या छायाचित्र प्रदर्शनात कॅनडा व अलास्का भेटीत कॅमे-यात बंद केलेल्या रम्य निसर्गाचे व विविध वैशिष्टयांचे रंजक दर्शन घडविले आहे. ही छायाचित्रे अर्काव्हल पेपरवर काढून ती कलात्मकतेने या प्रदर्शनात मांडली आहेत.
विविध वातावरणातील व ऋतूतील निसर्गरम्य रुपे व त्यातील वैशिष्टय़पूर्ण नयनरम्य आविष्कार मनोवेधक आहे. त्यांची ही नयनरम्य अद्वितीय फोटोग्राफी सर्वाना मनोरंजनासह दृश्यानंद व मानसिक आनंद देईल यात शंका नाही.
प्रवीण खंडेलवाल यांना कॉलेज जीवनापासून छायाचित्र काढण्याची आवड होती. हीच आवड जोपासून नंतर त्यांनी विविध विषयांसह नवनवीन छायाचित्रे काढून ती फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाच्या दरवर्षी भरणा-या वार्षकि कला प्रदर्शनातून तसेच अन्य ठिकाणी सादर केली. त्यांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
सुप्रसिद्ध चित्रकार उमाकांत कानडे यांनी अलीकडच्या काळात केलेल्या रंगलेखनाचे ‘नेचर’ हे चित्रप्रदर्शन हॉटेल लीलाच्या गॅलरी लीलामध्ये २० नाव्हेंबरपासून सुरू झाले असून, ते २६ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे.
निसर्ग म्हटले की अनेक रंगांचा आविष्कार असावा, अशी सर्वसाधारण समज असतेच. चित्रकार उमाकांत कानडे यांनी निसर्गात जाऊन निरीक्षण केले. त्या निसर्गाशी संवाद साधला आणि आपल्या रंगलेखनात मांडला.
मात्र त्यात विविध रंग न वापरता हा निसर्ग त्यांनी कृष्ण-धवल रंगात पेश केला आहे. या सर्जनशील चित्रकाराने निसर्गातली गुंतागुत आणि मानवी जीवनातली गुंतागुंत यांची सांगड घालून त्यामधला परस्पर संबंध ध्वनीत केला आहे. आई आणि बाळ, जगण्याची सहजता, त्याचबरोबर त्यात असलेला संघर्ष असे अनेक विषय निसर्ग बारकाईने न्याहाळून दगड, झाडं आणि पक्ष्यांच्या माध्यमातून कॅनव्हासवर साकार केले आहेत.
नसर्गिक वस्तूंचा प्रतीकात्मक वापर करून मानवी स्वभावाचे कंगोरे स्पष्ट करण्याचे कसब या रंगलेखकाच्या कुंचलात आहे. एक दगड अनेक आघात सहन करतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा सामना करताना त्याच्या जवळ असलेली सहिष्णुता, संयम, शक्ती, आत्मबळ हे गुण या चित्रकाराला दिसले. तो निसर्ग हाच जीवनाचा भाग आहे आणि त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे, याचीही जाणीव हे प्रदर्शन बघताना होते.
हा निसर्ग आपणाला सतत काही तरी सांगत असतो ते ऐकण्यासाठी मात्र आपल्या जवळ तसे कान पाहिजेत. चित्रकार उमाकांत कानडे यांच्या जवळ ते आहेत, त्यांना निसर्गाची हाक ऐकू येते. या प्रदर्शनामधील सुंदर चित्रांचा आधार घेऊन त्यांनी निसर्गाचा तो निरोप कलारसिकांपर्यंत पोहोचवला आहे.