काँग्रेसचे तरुण, तडफदार कर्तव्यनिष्ठ आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने देवगड व परिसरातील समुद्रातील अदभुत विश्व आता देशी-विदेशी पर्यटकांसाठी खुले होणार आहे.
देवगड – काँग्रेसचे तरुण, तडफदार कर्तव्यनिष्ठ आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने देवगड व परिसरातील समुद्रातील अदभुत विश्व आता देशी-विदेशी पर्यटकांसाठी खुले होणार आहे. ‘देवगड मरीन अॅडव्हेन्चर’ या कंपनीच्या मदतीने देवगड, मिठबाव, तांबळडेग समुद्रात व तारामुंबरी खाडीत स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू करण्यात येत आहे.
या सेंटरचे भूमिपूजन २० डिसेंबरला आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आमदार राणे यांनी देवगड येथे स्कुबा डायव्हिंग सुरू करत असल्याची घोषणा ट्विटरवर करून देवगडवासीयांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे.
देवगडकरांना पर्यटनाच्या दृष्टीने मी लवकरच खूशखबर देईन, असे आमदार नितेश राणे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी ही अनोखी भेट दिवाळीच्या दिवशी दिली आहे. मालवण तालुक्यात तारकर्ली, देवबाग येथील समुद्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू झाल्यानंतर तेथे प्रशिक्षण घेतलेल्या मच्छीमार कुटुंबातील अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला.
देवबाग, तारकर्ली, मालवण समुद्र किनारा देशी-विदेशी पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरला आहे. त्यामुळे तेथे पर्यटनात उद्योगात फार मोठी भर पडली आहे. असेच स्कुबा डायव्हिंग सेंटर देवगड तालुक्यातही सुरू व्हावे, अशी मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे ते देवगड येथे पाण्याच्या जनआंदोलनासाठी आले असताना अनेक संघटनांनी केली होती.
या वेळी सर्व पर्यटनाचे उपक्रम मालवणला उभारले जातात. देवगडच्या पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने देवगडातही पर्यटन प्रकल्प उभारले जावेत. देवबाग, तारकर्लीप्रमाणेच देवगड समुद्रातही स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू व्हावे, अशी मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे देवगडातील अनेक संस्थांच्या कार्यकर्ते-पदाधिका-यांनी केली होती.
या वेळी मी तुम्हाला डिसेंबरमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने खूशखबर देईन, असे आश्वासन आमदार राणे यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी स्कुबा डायव्हिंगचे भूमिपूजन २० डिसेंबर रोजी सुरू करणार असल्याचे ट्विटरवर सांगितले होते. देवगड समुद्र व तारामुंबरी येथील खाडीत दडलेले हे समुद्राखालील विश्व या निमित्ताने पर्यटकांसमोर येणार आहे.