शहरात गुरुवारी अंबेमातेच्या विसर्जनादरम्यान दोन वेगवेगळ्या घटनांत तरुण बुडाले. कुर्ला येथील शीतल तलावात काही तरुण दारू पिऊन उतरले होते. त्यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला, तर शिवाजी पार्क चौपाटीवरही एक तरुण बुडाला.
मुंबई – शहरात गुरुवारी अंबेमातेच्या विसर्जनादरम्यान दोन वेगवेगळ्या घटनांत तरुण बुडाले. कुर्ला येथील शीतल तलावात काही तरुण दारू पिऊन उतरले होते. त्यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला, तर शिवाजी पार्क चौपाटीवरही एक तरुण बुडाला. या दोन्ही घटनांमुळे विसर्जन सोहळ्याला गालबोट लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी कुर्ला येथील शीतल तलावात काही तरुण दारू पिऊन पोहण्यासाठी उतरले होते. कुर्ल्यातच संदेशनगरमध्ये राहणारा रोहित शेलारही त्यांच्यात होता. दारू प्यायलेल्या या तरुणांनी जास्तीत जास्त वेळ पाण्याखाली राहण्याबाबत स्पर्धा केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दुपारी साडेतीनच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित बुडाला. पोहण्यासाठी उतरलेल्यांनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. अग्निशमन दलाचे जवान लगेच घटनास्थळी दाखल झाले. अखेर शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास रोहितचा शोध लागल्याची माहिती परिमंडळ ५चे पोलिस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली. रोहितसोबत तलावात पोहण्यासाठी कोण कोण उतरले होते, याची चौकशी होणार असल्याचेही ते म्हणाले.
तर शिवाजी पार्क चौपाटीवरही बुडून एक जणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश खांबे हा वडाळ्यातील रहिवासी होता. अंबेमातेची मूर्ती तराफ्यावर घेऊन तो समुद्रात गेला होता. विसर्जन करून पुन्हा चौपाटीकडे येताना त्याने तराफ्यावरून उडी मारली आणि तो बुडाला. सोबतच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर चौपाटीवरील जीवरक्षकांना तासानंतर तो सापडला.