माहीम रेल्वे स्थानक ते धारावी जंक्शनपर्यंत म्हाडातर्फे बांधण्यात येणा-या २६० मीटरपर्यंतच्या स्कायवॉकचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुंबई- माहीम रेल्वे स्थानक ते धारावी जंक्शनपर्यंत म्हाडातर्फे बांधण्यात येणा-या २६० मीटरपर्यंतच्या स्कायवॉकचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या तीन महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होणे अपेक्षित असून १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या स्कायवॉकचे लोकार्पण करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.
६४० मीटर लांबीच्या या स्कायवॉकसाठी सुमारे ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र सध्या १४ कोटी निधी उपलब्ध असल्याने उर्वरित निधी मिळेपर्यंत २६० मीटरपर्यंतच स्कायवॉक पूर्ण करता येणार आहे. उर्वरित कामासाठी २१ कोटी निधीच्या प्रतीक्षेत म्हाडा आहे. मात्र अद्याप हा निधी मिळाला नसल्याने प्रस्तावित ६४० मीटर लांबीपर्यंत स्कायवॉक बांधता येणार नाही.
त्यामुळे २६० मीटरचा स्कायवॉक पूर्ण झाल्यानंतर तो जनतेसाठी खुला करण्याचे ‘म्हाडा’ने ठरवले आहे.या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी आणि वृद्धांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय रस्ता ओलांडताना अनेक दा अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. स्कायवॉकचे काम अध्र्यावर का होईना तो आता लवकरच खुला होणार असल्याने येथील वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
म्हाडा बांधकाम करत असलेला हा पहिलाच स्कायवॉक आहे. ‘एमएमआरडीए’कडून बचत झालेला उपलब्ध निधी या प्रक ल्पासाठी वापरला जाणार आहे. १४ कोटींच्या निधीतून जेवढा शक्य होईल तितक्या लांबीच्या स्कायवॉकचे बांधकाम करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला व तो नियोजनाप्रमाणे वेळेत पूर्ण होणार आहे. सरकारकडून उर्वरित २१ कोटींचा निधी मिळाल्यानंतर ६४० मीटरचा स्कायवॉक पूर्ण केला जाईल. तीन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे, असे एका अधिका-याने सांगितले.