धारावीतील ९० फूट मार्गावरून स्कूलबस जात असताना अचानक रस्ता खचला आणि त्यामुळे पडलेल्या मोठय़ा खड्डय़ात बसचे चाक अडकले.
मुंबई- धारावीतील ९० फूट मार्गावरून स्कूलबस जात असताना अचानक रस्ता खचला आणि त्यामुळे पडलेल्या मोठय़ा खड्डय़ात बसचे चाक अडकले. अचानक घडलेल्या या घटनेने विद्यार्थीही घाबरले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. सुदैवाने बसमधून प्रवास करणारे सर्वच्या सर्व २० विद्यार्थी सुखरूप आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिस उपायुक्त (परिमंडळ-५) धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
धारावीतील ९० फूट मार्ग या रस्त्याखालून पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहिनी आहे. त्यामुळे या भागाला पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी या ठिकाणाहून स्कूलबस जात असताना अचानक रस्ता खचला व १६ फुटांचा खोल खड्डा पडला. त्यात स्कूलबसचा मागचा टायर अडकला. घडलेल्या या प्रकारमुळे बसमधून प्रवास करणारी मुले घाबरली. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातानंतर खड्डय़ाभोवती बॅरिकेट लावण्यात आले. मंगळवारी सकाळी या रस्त्याची दुरुस्ती सुरू केली जाईल, असे महापालिकेडून सांगण्यात आले.