कुठल्याही ‘पार्टी’त जशी गंमत असते, तसाच थोडाफार धोकाही असतो. तो ज्याच्या-त्याच्या अतिरेकावर अवलंबून असतो. मात्र नुकतीच मुंबईत एक अशी पार्टी झाली की, जी खरोखरच धोकादायक होती.
कुठल्याही ‘पार्टी’त जशी गंमत असते, तसाच थोडाफार धोकाही असतो. तो ज्याच्या-त्याच्या अतिरेकावर अवलंबून असतो. मात्र नुकतीच मुंबईत एक अशी पार्टी झाली की, जी खरोखरच धोकादायक होती. या पार्टीचा विषय अनुभव अंगावर काटा आणणाराच होता. निमित्त होतं ते ‘कलर्स’वर सुरू होणा-या ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाच्या तिस-या पर्वाच्या घोषणेचं. पण सरळ व्यासपीठावर येऊन आम्ही हा खतरनाक कार्यक्रम सुरू करतोय, असं जाहीर करायचं ना? पण त्यात काय गंमत असणार, म्हणून ‘कलर्स’ने उपस्थितांना एक सणसणीत, यादगार अनुभव दिला. ठिकाण होतं ते जुहूतलं टय़ुलिप स्टार हे हॉटेल. एरवी पार्टीत बराच झगमागाट असतो, पण या पार्टीत उलटाच प्रकार होता. सगळीकडे इतका अंधार होता की, हॉटेल बंद आहे की, काय अशी शंका यावी. हॉटेलच्या मागच्या बाजूच्या खुल्या जागेवर एक अवाढव्य सेट उभारण्यात आला होता, त्यात काही इमारती व काही खिडक्या व दरवाजे दिसत होते. या इमारतींचं बॅकग्राउंड वापरून एक भव्य स्टेज उभारण्यात आलं होतं. आता केवळ एखाद्या कार्यक्रमाच्या घोषणेसाठी इतकं मोठं स्टेज कशाला? त्याचं उत्तर हा कार्यक्रम सुरू झाल्यावर मिळालं. काही वेळातच कार्यक्रम सुरू करत असल्याची घोषणा झाली व उत्सुकता आणखीच वाढली. स्टेजवर आता काही गंमत पाहायला मिळणार, असं वाटत असतानाच अचानक स्टेजवरील दरवाजा धाडकन तुटला. सगळ्यांना धक्का देत रेडिओ जॉकीने स्टेजवर एन्ट्री घेतली. तिच्या सततच्या बोलण्यानेही काही जणांना धक्का बसल्याचं ते सांगत होते. त्यानंतर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाला व्यासपीठावर बोलावण्यात आलं. त्याने चालत व्यासपीठावर यावं की नाही? पण हा पठ्ठा चक्क सगळ्या बाजूने पेटलेली गाडीच घेऊन तिथे आला. येताना स्टेजवर लावण्यात आलेली काचही त्याने फोडून टाकली. काचेच्या तुकडय़ांवर तसाच उभा राहून त्याने शोच्या स्पर्धकांची ओळख करून दिली.
‘खतरों के खिलाडी’च्या मागील दोन सत्रांमध्ये अक्षय व प्रियंका चोप्रा यांनी सूत्रसंचालकाची भूमिका बजावली होती. यावेळी मात्र ‘कलर्स’ला वेगळं नाव हवं होतं. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा रोहित शेट्टीकडे वळवला. रक्तातच स्टंट असलेला रोहित लगेच तयार झाला नाही, पण त्याने भरपूर विचार करून शेवटी या कार्यक्रमात सहभागी व्हायचं ठरवलं. तो आला म्हणजे त्यात अधिक नावीन्य हे येणारच, त्यात त्याचा या क्षेत्रातला अनुभव फार मोठा, तो एक कुशल व यशस्वी दिग्दर्शक व नुकत्याच झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या यशाने अगदी मोठय़ा लोकांच्या पंक्तीत जाऊन बसलेला हसतमुख रोहित या वेळच्या ‘खतरों के खिलाडी’चं मुख्य आकर्षण असणार आहे. त्याच्या येण्याने या शोमध्येही जान आली.
रोहितने आपल्या कलाकारांची ओळख अगदी वेगळ्या पद्धतीने करून दिली. आधी त्याने त्यांच्याविषयीची एक ध्वनिचित्रफीत दाखवली. त्यानंतर एकेक धोकादायक स्टंट करतच कलाकारांनी स्टेजवर एन्ट्री घेतली. कुणी पेटत्या दरवाज्यातून, कुणी दरवाजा तोडून, कुणी वरून उडी मारून तर कुणी चक्क मोटारसायकलवरून अगदी भरधाव येत व्यासपीठावर दाखल झालं. या वेळी ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचं नावही थोडं बदलण्यात आलं असून, ते आता ‘डर का ब्लॉकबस्टर’ असं करण्यात आलं आहे. शोची निर्मिती ‘इंडमोल’ यांची आहे. या वेळच्या कार्यक्रमाचं चित्रीकरणही केपटाऊन इथेच होणार असल्याची माहिती यावेळी ‘इंडमोल’चे दीपक धर यांनी दिली. या सत्रात रणवीर शौरी, निकितीन धीर, मुग्धा गोडसे, रजनीश दुग्गल, ‘सीआयडी’मधला जांबाज इन्स्पेक्टर दया, रोशेल मारिया राव, गौहर खान, कुशाल डंडन, पूजा गौर, माही विज, सलमान खान व रोहितच्या अनेक चित्रपटांमध्ये स्वत: स्टंट करणारी गीता टंडन सहभागी होणार आहे. त्यांना दक्षिण आफ्रिकेत ठेवून त्यांच्याकडून वेगवेगळे स्टंट करून घेतले जाणार आहेत. या सत्राचं वैशिष्टय़ म्हणजे यावेळी कोणत्याही स्टंटमध्ये मुलगा किंवा मुलगी असा भेद केला जाणार नाही.
या घोषणेनंतर ही पार्टी तशी संपली व जेवण्याचं आमंत्रण देण्यात आलं. आपला हा कार्यक्रम रात्री नऊ वाजता असल्याने यावेळी कोणत्याही प्रकारचे खाण्यापिण्याचे स्टंट केले जाणार नसल्याची माहिती ‘कलर्स’चे सीईओ राज नायक यांनी दिल्यानंतरच मंडळी निर्धास्तपणे जेवायला गेली.