शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयावरुन माघार घेतली आहे.
मुंबई – शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी राजीनामा देण्याच्या निर्णयावरुन माघार घेतली आहे. दहीसरचे शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून होणा-या मानसिक छळाला कंटाळून बुधवारी संध्याकाळी म्हात्रे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
मात्र शिवसेना नेतृत्वाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला आहे. आपल्याला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा देऊ नको सांगितल्याने आपण राजीनामा देणार नाही असे म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
बुधवारी संध्याकाळी दहीसरमधील घोसाळकर समर्थक महिला पदाधिका-यांनी शीतल म्हात्रे यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करत धुडगूस घातला. म्हात्रे यांच्यावरच उलट बदनामीचे आरोप केले त्यामुळे या सर्व प्रकाराचा मानसिक धक्का बसल्याने म्हात्रे यांचा रक्तदाब वाढला व त्या इमारतीखालीच चक्कर येऊन कोसळल्या. त्यांच्यावर दहीसरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विनोद घोसाळकर यांच्या कार्यपध्दतीविरोधात आवाज उठवल्याने शीतल म्हात्रे, माजी महापौर डॉ.शुभा राऊळ आणि मनीषा चौधरी यांची बदनामी सुरु आहे. शुभा राऊळ यांच्या फेसबुक पोस्टवरुन शिवसेनेतील हा अंतर्गत वाद चव्हाटयावर आला.
या सर्व प्रकरणात शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे अनेकदा दाद मागूनही या महिला नगरसेविकांना उध्दव ठाकरे यांची भेट मिळाली नाही. अखेर काल हा वाद विकोपाला गेल्यानंतर रात्री उशिरा म्हात्रे यांची उध्दव ठाकरेंबरोबर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला.