वर्षातले सहा-सात महिने सूर्यप्रकाशाला अक्षरश: पारखे होणारे नॉर्वेमधील जुकान शहरवासी आता आनंदाने हरखले आहेत, कारण तिथं उगवला आहे काचेचा कृत्रिम सूर्य! या काचेच्या सूर्याला म्हणजेच भव्य सोलर ग्लास रिफ्लेक्टर्सना पाहण्यासाठी जुकानमध्ये पर्यटकांची गर्दी वाढते आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लोपासून अवघ्या शंभर किमी अंतरावर असणारं हे जुकान शहर गॉस्टाटोप्पेन पर्वतराजीनं वेढलेलं आहे. जुकानमध्ये हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये कृत्रिम सूर्यप्रकाश मिळावा म्हणून मिरर प्रोजेक्टअंतर्गत अत्यंत महागडे असे सोलर ग्लास रिफ्लेक्टर्स बसवण्यात आले आहेत.
नॉर्वेचं जुकान शहर पर्वतराजीत इतकं खोल दडलेलं आहे की, हिवाळ्यातले काही महिने म्हणजे खरं तर अर्ध वर्ष इथं सूर्यप्रकाश पोहोचतच नाही. या पर्वताची शिखरं सुमारे १८०० मीटर उंचीची आहेत आणि तिथल्याच वेस्टफोर्ड व्हॅलीजवळ हे छोटंसं साडेतीन हजार लोकवस्तीचं शहर आहे. १९१३मध्ये नॉर्वेमधील एक उद्योगपती व अभियांत्रिक सॅम्युएल आइड यानं या शहराची रचना करून ते विकसित केलं. त्याचा पुतळा आजही जुकानमधलं एक प्रेक्षणीय स्थळ आहे. शंभर वर्षापूर्वी त्याच्या कारखान्यातील कामगारांची राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यानं हे शहर शोधलं. त्या काळात आइडनं तिथं जगातला मोठा असा पहिला जलविद्युत प्रकल्प सुरू केला. जुकानमध्ये कृत्रिम सूर्यप्रकाश ग्लास रिफ्लेक्टर्सद्वारे आणण्याचीही योजना खरं तर सॅम्युएल आइडचीच. पण आर्थिक अडचणींमुळे तेव्हा ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही.
नॉर्वेमध्ये उन्हाळ्यात कधीच सूर्य मावळत नाही हे इथलं वैशिष्टय आणि त्याच्या उलट हिवाळ्यात नॉर्वेवासीयांसाठी सूर्यप्रकाश दिसणं मुश्कील होतं. पृथ्वीचा उत्तर ध्रुवीय अक्षांश सूर्याजवळ झुकत जातो व हिवाळ्यात दक्षिण ध्रुवीय अक्षांश सूर्याच्या अधिक जवळ असतो. त्यामुळे जगाच्या अगदी उत्तरेकडे असणा-या काही शहरांपैकी असलेल्या नॉर्वेत ही परिस्थिती निर्माण होते.
जुकान शहरात सप्टेंबर ते मार्च महिन्यात सूर्याचा प्रकाश जवळजवळ नसतोच. इथलाच एक नागरिक मार्टिन अॅण्डरसन यानं सॅम्युएल आइडची अपूर्ण राहिलेली योजना पूर्ण करण्याचा निर्णय सुमारे बारा वर्षापूर्वी घेतला आणि गेल्याच महिन्यात हे सोलर ग्लास रिफ्लेक्टर्स जुकान शहरावर झळकले आहेत. सूर्यप्रकाश मिळावा म्हणून सुमारे ५३,६०,६,६३० रुपये खर्च करून गॉस्टाटोप्पेन पर्वतावर शहराच्या आतल्या बाजूने साडेचारशे फूट उंचीवर प्रत्येकी सतरा चौरस मीटर आकार असणारे तीन भव्य हेलिओस्टॅट म्हणजेच सोलर ग्लास रिफ्लेक्टर्स बसवण्यात आले आहेत. नॉर्वेजियन भाषेत याला सोलस्पिल म्हणतात व हे सोलर रिफ्लेक्टर्स बसवणा-या मार्टिन अॅण्डरसनच्या कंपनीचं नावही तेच आहे. हे रिफ्लेक्टर्स संगणकाद्वारे नियंत्रित होतात व वेबकॅमवरून त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं.
अॅरिझोनामधील सन डेव्हिल स्पोर्टस् स्टेडियममध्ये गवताची वाढ नियमित राहावी म्हणून अनेक छोटे सोलर रिफ्लेक्टर्स बसवण्यात आले आहेत. मध्यपूर्वेतील आणि काही आखाती देशांमध्येही स्टीम टर्बाईन व पॉवर प्लँट चालवण्यासाठी सोलर रिफ्लेक्टर्सचा वापर केला जातो.
या मिरर प्रोजेक्टचा कर्ताधर्ता असणा-या मार्टिन अॅण्डरसन याने विगानेला या इटलीच्या गावाला आधी भेट दिली जिथं अशाच प्रकारचे पण लहान आकाराचे सोलर रिफ्लेक्टर्स बसवलेले आहेत. आता जुकानच्या मुख्य चौकाच्या २१०० चौरस फूट क्षेत्रफळात हा कृत्रिम सूर्यप्रकाश खेळवला जातो. हा खूपच रेंगाळलेला प्रकल्प होता, मात्र हिवाळ्यात सूर्यप्रकाश मिळू लागल्याने जुकानवासीयांच्या चेह-यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे असं अॅण्डरसननं म्हटलंय. अत्यंत महागडा व वेळखाऊ प्रकल्प म्हणून प्रथम या प्रकल्पाला इथल्या नागरिकांचा व नगरपालिकेचाही विरोध होता. परंतु आता सर्वच जण या कृत्रिम सूर्यप्रकाशाच्या प्रेमात पडले आहेत. जुकानचे अबालवृद्ध याचा आनंद घेत आहेत. सूर्यप्रकाशाअभावी निर्माण होणा-या आरोग्याच्या कित्येकांच्या तक्रारीही आता दूर होतील, असं इथल्या डॉक्टरांना वाटत आहे. जुकानच्या या हायटेक कृत्रिम सूर्याची चर्चा आता जगभर होते आहे. या प्रकल्पासाठी नॉर्वे सरकार, सॅम्युएल आइड याची नॉर्स्क हायड्रो कंपनी व जुकान नगरपालिकेने आर्थिक साहाय्य केलं आहे. शहराच्या छोटयाशा भागात तरी आता निदान सूर्यप्रकाश मिळतोय याचाच आनंद इथल्या प्रत्येकाला झाला आहे.