सासू आणि सून यांच्यात वाद, मतभेद होणे नवीन नसले तरी मृतदेहावरून सुरू झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे.
मुंबई – सासू आणि सून यांच्यात वाद, मतभेद होणे नवीन नसले तरी मृतदेहावरून सुरू झालेला वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मर्चंट नेव्हीत नोकरी करणा-या अवनीश सिपाहिया यांच्या मृतदेहाचा ताबा मिळण्यासाठी पत्नी परमित यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या प्रकरणी अवनीश यांच्या आईला गुरुवारी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब करण्यात आली.
परमित आणि अवनीश यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, त्याला अवनीशच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे भाईंदरला आई राहते त्याच परिसरात दुस-या इमारतीत अवनीश परमितसह वेगळे राहत होते. त्यांना आठ वर्षाची मुलगीही आहे. मर्चंट नेव्हीमध्ये सेकंड ऑफिसर म्हणून काम करणारे अवनीश अमेरिकेच्या प्रवासाला निघाले होते. प्रवासात काही आठवड्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मात्र, कंपनीतील नोंदींनुसार ते अविवाहित असल्याने ही बाब त्याच्या पालकांना अर्थात आईला कळवण्यात आली. अवनीशच्या आईने त्यांच्या मृतदेहाचा ताबा स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही केली.
सासरच्या मंडळींशी कुठलेच संबंध नसल्याने व त्यांच्यापासून वेगळे राहत असल्याने, त्यांनी अवनीशचा मृत्यू झाल्याचे आपल्याला कळवले नाही. ही बाब शेजा-यांकडून कळल्यानंतर पत्नी या नात्याने, पतीचा मृतदेह आपल्याला मिळावा, असा दावा करत परमितने त्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र, तिचा पत्नी असल्याचा दावाच संबंधित कंपनीने अमान्य केल्याने तिने वकील देवेंद्र शुक्ला यांच्यामार्फत उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक आणि न्या. अशोक भंगाळे यांच्या खंडपीठापुढे याचिका केली. अवनीशशी लग्न झाल्याचे पुरावेही त्यांनी न्यायालयात सादर केले. त्यावर, न्यायालय सांगेल त्या व्यक्तीला मृतदेहाचा ताबा द्यायला तयार आहे, अशी भूमिका संबंधित कंपनीने घेतली.