मुंबईत समुद्रात तरंगत्या हॉटेलमध्ये खमंग, लज्जदार जेवणाचा आस्वाद घेत सैरही करता आली तर? काहीसे स्वप्नातले वाटणारे हे दृष्य प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे.
मुंबई – मुंबईत समुद्रात तरंगत्या हॉटेलमध्ये खमंग, लज्जदार जेवणाचा आस्वाद घेत सैरही करता आली तर? काहीसे स्वप्नातले वाटणारे हे दृष्य प्रत्यक्षात अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, डब्ल्यू. बी. इंटरनॅशनल कन्सल्टंट्स आणि एबी हॉस्पिटॅलिटी यांच्या सहकार्याने मुंबईच्या समुद्रात देशाचे पहिले तरंगते हॉटेल मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे.
वांद्रे येथे या एबी सेलेस्टिअल हॉटेलचे उद्घाटन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वांद्रे करण्यात आले. सप्टेंबरपासून हे हॉटेल खुले होईल. मुंबईत मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.
आता पर्यटकांबरोबर मुंबईकरांनाही लज्जतदार जेवणसह आगळ्या-वेगळ्या पर्यटनाची मजा ‘लक्झरी प्लोएटल’च्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. हे तरंगत्या एबी सेलेस्टिअल हॉटेलची बोट अमेरिकेत तयार करण्यात आली आहे. या बोटीची किंमत सुमारे १०० ते १०५ कोटी रुपये आहे.
अशा दोन बोटी या उपक्रमाकरता घेण्यात आल्या आहेत. वांद्रे-वरळी सी-लिंक या ठिकाणी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डच्या जेटीवर ही लक्झरी प्लोएटल उभी आहे. या लक्झरी प्लोएटलमध्ये २ रेस्टॉरन्ट, २४ तास कॉफी शॉपसह क्लब, लॉजही असणार आहे. विशेष म्हणजे या रेस्टॉरन्टमध्ये पर्यटकांना नेहमीच्या दरातच खाद्य पदार्थाची चव चाखता येणार आहे.
मुंबईच्या समुद्रात ३६० अंशात अथांग सागर आणि भव्य मुंबईचे दर्शन या प्लोअएटलमधून लुटता येणार आहे. मागील दीड वर्षापासून या उपक्रमाकरता प्रयत्न सुरू होते. येत्या ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ही बोट मुंबईकरांच्या पर्यटनासाठी उपलब्ध होणार असल्याचे डब्ल्यू. बी. इंटरनॅशनल कन्सल्टंटचे व्यवस्थापकीय संचालक चेतन झेंडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने विविध घटकांशी समन्वय साधून ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी येणा-यांना हे पाण्यावरील हॉटेल मोठे आकर्षण ठरेल, असा विश्वास पर्यटनमंत्री भुजबळ यांनी या हॉटेलच्या उद्घाटनावेळी व्यक्त केला. या वेळी राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया, अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी आदी उपस्थित होते.