महिलांना स्वच्छ आणि मोफत प्रसाधनगृहासाठी लढणा-या ‘राइट टू पी’च्या कार्यकर्त्यांना परिमंडळनिहाय बैठकीतील पहिल्या पाच बैठकीत प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागले.
मुंबई- महिलांना स्वच्छ आणि मोफत प्रसाधनगृहासाठी लढणा-या ‘राइट टू पी’च्या कार्यकर्त्यांना परिमंडळनिहाय बैठकीतील पहिल्या पाच बैठकीत प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागले. पहिल्या तीन झोनच्या अंमलबजावणीविषयी विचारणा झाल्यास तसेच झोन ४ व ५च्या बैठकीतील वॉर्डनिहाय पालिका अधिका-यांकडून मिळणा-या चुकीच्या माहितीमुळे बैठकीबाबत संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
आचारसंहितेमुळे तसेच निवडणुकीच्या तयारीत कामगार व्यस्त असल्याने कामाची मंद गती कायम असल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारीही झोन सहामध्ये आचारसंहितेचा पाढा पुन्हा गायला गेला. दरम्यान आचारसंहितेमुळे कामच होणार नाही का, असा पलटवार घनकचरा व्यवस्थापनाचे पालिका सहआयुक्त प्रकाश पाटील यांनी केल्याने त्यांच्या भुवया उंचावल्या.
गुरुवारी झोन सहा अंतर्गत एन. एस. टी आदी वॉर्डाच्या बैठका घेण्यात आल्या. आजवरच्या झोननिहाय बैठकींमध्ये पहिल्यांदाच वॉर्डनिहाय अधिका-यांनी आपापल्या विभागाची अचूक माहिती सादर केल्याने राइट टू पीच्या समिती सदस्यांना धक्काच बसला. या बैठकीतील एन वॉर्डची कामगिरी वगळता इतर दोन वॉर्डातील समिती अधिका-यांनी योग्य माहिती आणल्याचे महिला फेडरेशनच्या सदस्या मुमताज शेख यांनी सांगितले.
घाटकोपर येथील पालिका अधिका-यांकडून उडवाउडवीची उत्तरे ऐकल्यानंतर इतक्या वेळ आचारसंहितेचे कारण देणा-या पाटील यांनीच या कारणामुळे काम थांबले तर कसे चालेल, असा सवाल वॉर्डनिहाय पालिका अधिका-यांना केल्याने राइट टू पी कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले.
या कामात खासगी शौचालय कंत्राटदारांचा सुळसुळाट रोखण्यासाठी एकजुटीने काम करा, असेही त्यांनी सांगितले. या विभागांमध्ये ज्या ठिकाणी कायमस्वरूपी महिला शौचालये बांधणे शक्य नाही, त्या ठिकाणी मोबाइल शौचालये बांधण्यासंदर्भात राइट टू पी सदस्य आग्रही राहिले. गेल्या दोन बैठकांत झोन ४ व ५च्या बैठकीत राइट टू पीच्या सदस्यांना प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागले होते. मात्र नुकत्याच झालेल्या बैठकीतील वॉर्डनिहाय पालिका अधिकाऱ्यांचे काम पाहून राइट टू पीच्या कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. शुक्रवारी परिमंडळ सातची आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शेवटची बैठक होणार आहे.
२५ रोजी आढावा बैठक
येत्या २५ तारखेला महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासोबत समितीतील पालिका अधिका-यांची आढावा बैठक होणार आहे. परंतु या बैठकीत समितीतील राइट टू पी कार्यकर्त्यांना अद्याप बोलावण्यात आलेले नाही. याविषयी पालिका अधिका-यांकडून टाळाटाळ होत असल्याने आपण स्वत: कुंटे यांच्याशी ईमेलद्वारे पत्रव्यवहार करणार असल्याचे महिला फेडरेशनच्या अध्यक्ष मुमताज शेख यांनी सांगितले.