कुर्ल्यातील हॉटेल सिटी किनारा उपाहारगृहातील आग दुर्घटनेनंतर महापालिकेच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली.
मुंबई- कुर्ल्यातील हॉटेल सिटी किनारा उपाहारगृहातील आग दुर्घटनेनंतर महापालिकेच्या वतीने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. उपाहारगृहांमधील नियमबाह्य गोष्टींवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये परवान्यापेक्षा साठा करून ठेवलेले गॅस सिलिंडर जप्त करण्यात आल्यानंतर ते पुन्हा त्या उपाहारगृह मालकांना साभार परत करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी आपल्याकडे गोदाम नसल्यामुळे हे गॅस सिलिंडर उपाहारगृहांना परत केले असल्याची स्पष्ट कबुलीच समितीच्या बैठकीत दिली. त्यामुळे महापालिकेची ही कारवाई फसवी असल्याचे स्पष्ट होत आहे.
कुर्ल्यातील ‘हॉटेल सिटी किनारा’ उपाहारगृहाला आग लागल्याने आठ शाळकरी मुलांचा बळी गेला होता. आगीच्या या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व उपाहारगृहांची तपासणी करून अनधिकृत बांधकामे व नियमबाह्य कामांवर कारवाई करण्याचा फतवा जारी केला होता. त्याप्रमाणे परिपत्रक जारी करत सर्व विभाग कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
त्याप्रमाणे तब्बल आठ ते दहा दिवस ही कारवाई सुरू होती. त्यामुळे उपाहारगृहांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यापेक्षा साठा करून ठेवलेले सिलिंडर जप्त करण्यात आले होते. या कारवाईत तब्बल दोनशेहून अधिक गॅस सिलिंडरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत गुरुवारी शिवसेना नगरसेविका अनुराधा पेडणेकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत सिटी किनारा उपाहारगृहाच्याआगीच्या दुर्घटनेचा अहवाल सादर करावा, अशी मागणी केली. सिटी किनारा उपाहारगृहाच्या आग दुर्घटनेनंतर श्रेणी २ व श्रेणी ३ च्या सर्व उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली.
मात्र ज्या उपाहारगृहांना सील ठोकले होते, ती उपाहारगृहे पुन्हा सुरू झालेली आहेत, अशी माहिती देत या सर्वावर काय कारवाई केली जाणार आहे, त्यांचे परवाने रद्द का केले जात नाहीत. तसेच परवान्यांचे नूतनीकरण करताना त्यात अटींचा समावेश केला जावा, अशी मागणी पेडणेकर यांनी केली. जप्त केलेले सिलिंडरचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत शीतल म्हात्रे, मनसेचे संतोष धुरी यांनी अहवाल सादर करावा, अशी मागणी केली.
मात्र, त्यावर कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी जप्त केलेले सिलिंडर हे पुन्हा उपाहारगृहांच्या चालकांना देण्यात आल्याचे सांगितले. महापालिकेकडे हे सिलिंडर ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे ते परत देण्यात आल्याचे सांगत या आगीचा तसेच कारवाईचा अहवाल
पुढील बैठकीत दिला जाईल, असे उत्तर दिले. त्यामुळे प्रशासनाचा निषेध करत ही सभा तहकूब करण्यात आली.