पावसाळ्यामध्ये घराच्या भिंतींमध्ये पाणी झिरपणे, गच्ची गळणे, रंगांना पोपडे येणे, अशा अनेक समस्यांना प्रत्येकाला सामोरे जावे लागते. पावसाच्या कालावधीमध्ये घराची कशी काळजी घ्यायची, हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. वास्तविक पाहता पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच पावसाळ्यादरम्यान घेतल्या जाणा-या सुरक्षांबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
पाऊस सुरू होण्याआधी छप्परावरील अथवा गच्चीमधील पावसाचे पाणी वाहून नेणा-या सर्व पाईपलाइन्स व गटारे साफ आहेत किंवा नाहीत, याची खात्री करावी. जेणेकरून, पाऊस पडल्यावर गच्चीवर पाणी तुंबणार नाही. ब-याच वेळा जमिनीवरील गटारांमध्ये कचरा अथवा झाडांची पाने वगैरे साठून गटारे तुंबू शकतात.
पाऊस पडण्याआधी गच्चीच्या पॅरापेट वॉलवर साठलेली धूळ काढून घ्यावी. म्हणजे पावसाच्या पाण्याबरोबर ती धूळ इमारतींच्या भिंतीवर उतरणार नाही व रंग खराब होणार नाही.
पाऊस सुरू झाल्यावर पावसाचे पाणी वाहून नेणा-या पाईपना उन्हाळय़ात तडे गेलेले असतात. पाऊस पडू लागल्यावर गच्चीचे पाणी ज्या पाईपमधून गळते तेव्हाच ‘लिकेज’ समजते. अशा वेळी सर्व पाईपची पाहणी करून गळत असलेल्या पाईपची तातडीने दुरुस्ती करावी किंवा ते बदलावेत.
इमारतीच्या बाहेरच्या भिंतींना ब-याच वेळा तडे पडलेले आढळतात. अनेक लोक पावसाळय़ाआधी तडे बुजवण्याचा प्रयत्न करतात. कित्येक वेळा ते तडे तेथे थोडे खोदून मोठे करतात आणि नंतर बुजवतात. वास्तविकता असे करू नये. भिंतीवरच्या पडलेल्या सर्वच तडय़ांमधून पाणी झिरपेलच असे नाही. उलट कित्येक वेळा ते तडे थोडे रुंद करण्याच्या नादात तिथूनच ओल येण्याची शक्यता असते.
पहिला पाऊस झाल्यावर किंवा पाऊस सुरू झाल्यानंतर महिनाभराने भिंतींना कुठे कुठे ओल येते आहे, ते पाहावे. खुणा करून ठेवाव्यात व मग थोडी उघडीप मिळाली की, त्या गळण्याचा व भिंतीच्या बाहेरील बाजूंच्या तडय़ांचा एकत्रित विचार करून तेवढेच तडे बुजवावेत. शक्यतो मोठे करू नयेत. तर वॉटर प्रुफिंगचे कंपाऊंड व पांढरे सिमेंट यांची एकत्रित पेस्ट करून ती पेस्ट जोर देऊन तडे भरावेत. नंतर त्यावर हलका स्पंज मारावा व मग पावसामुळे त्याचे क्युरिंग होईलच. तसे नाही झाले तर त्यावर थोडे पाणी मारावे.
प्रत्येक केमिकलचा उपयोग त्याच्या पॅकेटवरील दिलेल्या सूचनांचा विचार करूनच करावा.
जी गोष्ट भिंतींमधल्या ओलीची, तीच गोष्ट छतातून गळणा-या पाण्याची. पाऊस चालू झाल्यावर छत गळत असेल तर पावसाची थोडी उघडीप मिळाली तर लगेच दुरुस्त करावी.
काही लोक वर्षानुवर्षे अशा गळतीचे दुरुस्ती काम करत नाहीत. अशा वेळी या गळतीमुळे स्लॅबच्या आतील सळय़ा गंजून खराब होण्याची शक्यता असते व स्लॅबलाही धोका पोहोचू शकतो.
स्लॅबची गळती त्वरित थांबवण्याची उपाययोजना करावी. ब-याच वेळा लोकांना वाटते की, छत गळायला लागले तर छतावरील वॉटर प्रुफिंगचे सर्व काम पुन्हा करावे. पण तसे नसते. जेथे गळत असते त्याच्या वरच्या भागावर तडे किती आहेत ते पाहावे व वरील वॉटर प्रुफिंग बोटाने वाजवून पाहावे व जिथे जिथे डब डब असा आवाज येईल तेवढाच भाग हळुवार रीतीने काढून घ्यावा. त्यावर थोडा केमिकलचा एक कोट मारावा व नंतर वरून थोडी बारीक वाळू पसरून मग वरून पुन्हा सिमेंट व वाळुमिश्रित गिलावा करावा. त्या गिलाव्यावर व आसपास थोडे दिवस पाणी साठवून ठेवावे व क्युरिंग पूर्ण झाल्यावर त्यावरून ब्रशने पुन्हा केमिकलचा एक हात मारावा व पुन्हा पाणी साठवावे व गळत नाही ना हे तपासून बघावे.
पाऊस सुरू झाल्यावर केलेली दुरुस्ती जरूर तपासून बघावी. इमारतीला बेसमेंट असेल तर, तेथे अथवा लिफ्टच्या डक्टमध्ये कुठे पाणी जमा होत नाही ना, याची खात्री करावी.
लिफ्टच्या डक्टमध्ये पाणी जमा होत असेल, तर त्वरित लिफ्ट वापरणे बंद करावे व त्यातील पाणी पूर्ण काढून व दुरुस्ती काम करून घ्यावे व नंतरच्या पावसात पुन्हा पाणी जमा होत नाही ना, हे पाहून मगच लिफ्ट वापरण्यास सुरुवात करावी.
रेन वॉटर हार्वेस्टिंग केले असेल तेथे पावसाचे पडलेले पाणी सोसायटीतल्या बोअरला रिचार्ज करत आहे ना, हेही पाहावे.
सोसायटीच्या आवारातील पावसाचे पाणी वाहताना त्याच सोसायटीच्या जमिनीखालील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये जात नाही ना, हेही तपासून बघावे.
इमारतीला रंगकाम करावयाचे असेल तर ते पाऊस सुरू होऊन दोन महिने झाले, पावसाचा पहिला जोर ओसरला की करावे. म्हणजे नंतर जो थोडा पाऊस पडेल त्याचा उपयोग सिमेंट पेंट मारला असेल, तर त्याच्या क्युरिंगसाठी होऊ शकतो व रंगकामानंतर कुठे ओल नाही ना हेही तपासून बघता येते. पाऊस पडत असताना पावसाचे पाणी वाहून नेणा-या पाईपचे तोंड काहीतरी कचरा पडून चोक होत नाही ना, हेही बघावे.
पावसाळय़ात लाकडी दरवाजे फुगतात. त्या दरवाजाची फ्रेमही लाकडी असेल तर शक्यतो दरवाजाऐवजी फ्रेमला रंधा मारावा व दरवाजा लागत आहे ना, हे तपासून पाहावे.
लोखंडी ग्रिल अथवा रेलिंग पावसामुळे कुठे गंजले आहे का, हेही तपासून बघावे. कुठे रंग निघाला असेल तर लगेच ऑईल पेंटने रंगकाम करून घ्यावे.
तुमच्या इमारतीची, घराची एवढी दक्षता घेतली तरी तुमचा पावसाळा सुखकारक जाईल.