केंद्र सरकार व महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन इंद्रधनुष्य’ या एकत्रित लसीकरण मोहिमेत ‘पोलिओ इंजेक्शन’चा समावेश करण्यात येणार आहे.
मुंबई- केंद्र सरकार व महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन इंद्रधनुष्य’ या एकत्रित लसीकरण मोहिमेत ‘पोलिओ इंजेक्शन’ (आयपीव्ही)चा समावेश करण्यात येणार आहे. ‘दो बुंद जिंदगी के..’ असे म्हणत पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मागील २० वर्षापासून तोंडावाटे देण्यात येणारी पोलिओ लस आता इंजेक्शनच्या स्वरूपात देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण पोलिओचे इंजेक्शन सुरू झाले म्हणून तोंडावाटे देण्यात येणारी लस बंद होणार नाही.
भारतात काही वर्षापूर्वी पोलिओ आजार होणा-या रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत होती. १९८८ या वर्षी १२५ देशांमध्ये पोलिओने ग्रासलेल्या किंवा मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या साडेतीन लाख इतकी होती. पण ‘पल्स पोलिओ लसीकरण’ ही मोहीम सरकारतर्फे सुरू झाल्यानंतर पोलिओची लागण झाल्याने होणा-या मृत्यूंमध्ये ९९ टक्के घट झाली.
याशिवाय या मोहिमेंतर्गत करण्यात येणा-या जनजागृतीमुळे मागील तीन वर्षात भारतात पोलिओचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पण पाकिस्तानात पोलिओ रुग्ण सापडत असल्याने ही पोलिओ मोहीम सुरू राहणार आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या मोहिमेत बदल केला असून पोलिओ नष्ट करणारी ‘पी २’ ही लस नेहमीप्रमाणे तोंडावाटे दिली जाणार आहे. त्याचबरोबर बालकांच्या ६व्या आणि १४व्या आठवडयात ‘पोलिओ इंजेक्शन’ ही लस ०.१ मी. लि. बालकाच्या उजव्या हातावर दिली जाईल. यामुळे बालकांना पोलिओ रोगापासून दुहेरी संरक्षण मिळणार आहे.
या दोन्ही लसी एकत्रितपणे पोलिओ रोगाचा समूळ नष्ट करू शकणार आहे. पण ही लस बालकांना देण्यासह पोलिओ रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी नियमित लसीकरण कार्यक्रमात बालकांना मुखावाटे दिल्या जाणा-या पोलिओ लसीचे व पोलिओ इंजेक्शनचे सर्व डोस घेतल्यानंतरही वेळोवेळी पल्स पोलिओ मोहिमेत मुखावाटे पोलिओ लस देणे अत्यंत गरजेचे असणार आहे.
इंजेक्शन उपयोगी का ?
इनॅक्विव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन (आयपीव्ही) हे इंजेक्शनद्वारे दिले जाणार आहे. थेट रक्तात दिल्या जाणा-या या लसीमुळे पोलिओस कारणीभूत विषाणूंचा एकदाच नायनाट होऊ शकतो. हा विषाणू नष्ट करण्यासाठी अनेकदा लस दिली जाते. पण आता फक्त दोनदा इंजेक्शन दिले जाणार आहे. या इंजेक्शनद्वारे अपंगत्व येण्याची शक्यताही कमी होईल.