दहशतवाद विरोधी कक्षात (एटीसी) कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत महाजन यांच्या सव्र्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी सुटून ते जखमी झाले.
मुंबई – दहशतवाद विरोधी कक्षात (एटीसी) कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत महाजन यांच्या सव्र्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी सुटून ते जखमी झाले. चुनाभट्टी पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी सव्वातीनच्या दरम्यान ही घटना घडली. त्यांच्यावर चेंबूरच्या सुराणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र चुकून गोळी सुटल्याने महाजन जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कामाच्या अनिश्चित वेळा, वरिष्ठांकडून होणारा त्रास आदींमुळे यापूर्वी कित्येक पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. महाजन हे चुनाभट्टी पोलिस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी महाजन हे पहिल्या मजल्यावरील कार्यालयात आले. तेव्हा तेथे दोन पोलिस शिपाई होते. काही महत्त्वाचे काम आहे, असे सांगून महाजन यांनी त्यांना बाहेर पाठवले. त्यानंतर दरवाजा बंद करून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर महाजन यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले.
डॉक्टरांनी महाजन यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. महाजन हे कुर्ला नेहरूनगर पोलिस वसाहत क्रमांक १०७ मध्ये राहतात. बुधवारी त्यांचे पत्नीसोबत भांडण झाल्याचे समजते. भांडणानंतर त्यांची पत्नी घरातून निघून गेली. त्यामुळे महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. मात्र महाजन यांच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. महाजन यांच्या कुटुंबीयांशी पोलिस संपर्क करत आहेत. मात्र महाजन यांच्या पत्नीचा मोबाइल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नसल्याचे समजते.