शनिवारचा दिवस, इतर आठवडय़ा अखेरसारखाच एक दिवस. कार्यालयात आठवडाअखेरीच्या मूडमध्येच काम सुरू होत असतानाच ‘प्रहार’च्या कार्यालयाला ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटाच्या कलाकारांनी दिलेल्या भेटीने या आठवडाअखेरीच्या उत्साहात एकच भर पडली.
शनिवारचा दिवस, इतर आठवडय़ा अखेरसारखाच एक दिवस. कार्यालयात आठवडाअखेरीच्या मूडमध्येच काम सुरू होत असतानाच ‘प्रहार’च्या कार्यालयाला ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटाच्या कलाकारांनी दिलेल्या भेटीने या आठवडाअखेरीच्या उत्साहात एकच भर पडली.
या चित्रपटातील एक प्रमुख अभिनेते ऋषिकेश जोशी, अभिनेत्री क्रांती रेडकर व मौसमी तोंडवळकर यांनी मर्डर मेस्त्री टीमच्या वतीने ही भेट दिली. ‘मर्डर मेस्त्री’ हा चित्रपट येत्या १० जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
सध्याच्या मराठी चित्रपटाच्या एका आश्वासक अशा परिस्थितीत मर्डर मेस्त्री नावाचा हा विनोदी चित्रपट असून या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच या चित्रपटात एक विलक्षण असं रहस्यही प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं ऋषिकेश जोशी यांनी यावेळी सांगितले. या चित्रपटात ऋषिकेश जोशी हे प्रभाकर या नावाच्या एका पोस्टमनची भूमिका करत आहेत.
हा एक साधारण शिक्षण असलेला पोस्टमन आहे. मात्र त्याला लोकांची पत्रं चोरून वाचण्याची एक वाईट सवय असते. त्या बाबतीत त्याला अनेकदा काही संकटांचाही सामना करावा लागतो. त्याची एक मुलगी आहे. त्याच्या मुलीला मात्र आपले वडील हे हिरोच वाटत असतात. त्यांच्या या वाईट सवयीमधून होणारा घोळ निस्तरायचा निर्णय हा प्रभाकर एकदा घेतो व त्यानंतर तो घोळ अधिकच वाढत जातो. अशा प्रकारची ही भूमिका आहे. या चित्रपटात प्रसंगनिष्ट अशा विनोदांची पखरण पाहायला मिळणार आहे, असं मत या दोन्ही कलाकारांनी यावेळी व्यक्त केले.
क्रांती रेडकर हिची भूमिकाही एक वेगळय़ा प्रकारची आहे. ती यात संजय खापरे याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. तिचं नाव सरस्वती असून ती थोडीशी मंद आहे. तिची बोलण्याची एक खास अशी शैली आहे. अगदी तिने जर कुणाबरोबर भांडण जरी केलं तरी ती अगदी गोड आवाजात करेल असं तिचं
व्यक्तिमत्त्व आहे.
मुळात तिचा बुद्धांक्य कमी असतानाही तिचं नाव सरस्वती आहे. इथूनच तिच्या व्यक्तिमत्त्वातल्या विसंगतीला सुरुवात होते, असं क्रांती यावेळी म्हणाली. या चित्रपटात अशा प्रकारच्या अनेक विनोदांची पेरणी आहे.
रहस्यमयतेच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला हा एक विनोदी चित्रपट असून या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ता, विकास कदम, मानसी नाईक यांच्याही भूमिका आहेत. तीन वेगवेगळय़ा वयोगटातल्या तीन जोडप्यांच्या जीवनात एका संशयामुळे काय काय वादळं निर्माण होतात हे या चित्रपटात दाखवण्यात आल्याचंही ते म्हणाले.
हा चित्रपट कोकणाच्या पार्श्वभूमीवर आहे. त्यात काही काही वेळा त्या मालवणी भाषेचा लहेजाही पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे तिथली मानसिकता, तिथल्या लोकांच्या गंमती जंमतीही या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. यात दिलीप प्रभावळकर हे एका सेवानिवृत्त डॉक्टरची भूमिका करत आहेत.
अगदी माणूसघाणा, लोकांना तुसडेपणाने वागवणारा अशा प्रकारचा हा डॉक्टर आहे. त्याच्या मनात त्या वयातही निर्माण झालेल्या संशयावर तो कसा प्रतिक्रिया देतो, हे पाहायलाही चांगलीच मजा येणार असल्याचं ऋषिकेश म्हणतो. या चित्रपटाच्या माध्यमातून या दोघांनी जे काही अॅडिशन्स घेतले ते तर अगदी भन्नाट होते.
या चित्रपटात भूमिका करणं हे माझ्यासाठी एक समृद्ध होण्याचं माध्यमच होतं. अनेक दिग्ग्ज कलाकारांबरोबर काम करायला मिळालं, त्याचबरोबर त्यांच्याकडून अनेक गोष्टी या शिकता आल्याचं क्रांती म्हणते. या चित्रपटात एका लहानशा पण महत्त्वाच्या भूमिकेत मौसमी तोंडवळकर ही चमकत आहे. ती म्हणते की या चित्रपटातली माझी भूमिका जरी लहान असली तरी ती फार महत्त्वाची आहे.
ती एका हॉटेलची मालकीण आहे व आपल्या हनिमुनला आलेल्या विकास व मानसी यांच्या मनात संशय निर्माण करण्याचं काम माझ्या भूमिकेने केलं आहे. आपल्या विविध भूमिकांसाठी व अॅग्रेसिव्ह या नाटकातल्या भूमिकेसाठी महाराष्ट्राला ठाऊक असलेल्या मौसमीसाठी ही भूमिका साकारणं या दिग्गज कलाकारांबरोबर भूमिका करणं हे खरोखरंच आनंददायक असल्याचं ती म्हणते.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आम्ही सगळय़ांनी जी काही मजा केली त्यामुळे या चित्रपटाचं काम करणंही एक आनंदयात्राच होती यावर सर्वच कलाकारांचं जवळ जवळ एकमत झालं.
सध्या या चित्रपटाचं प्रमोशन जोरात सुरू असून अधिकाधिक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा अशी अपेक्षाही या कलाकारांनी व्यक्त केली आहे. मर्डर मेस्त्री या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीतल्या विनोदी कलाकारांची एक जबरदस्त अशी जुगलबंदीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातला विनोदही थोडासा वेगळा, प्रगल्भ असा आहे.
त्यात शब्दांमधून होणारा विनोद तर आहेच आहे, त्याचबरोबर यात अनेक प्रसंगनिष्ट विनोदाचाही आनंद घ्यायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अब्रार नाडियादवाला व वैभव भोर यांनी केली असून या चित्रपटाची कथा नेहा कामत यांची आहे. पटकथा व संवाद प्रशांत लोके यांचे असून या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जाधव यांनी केले आहे. मर्डर मेस्त्री हा चित्रपट येत्या १० जुलै रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.